विशेष लेख: माेनालिसा, सैफ असे राेज काेणीतरी हवेच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:35 IST2025-01-26T10:35:40+5:302025-01-26T10:35:57+5:30
कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. कोणीतरी तिचा फोटो काढला. सोशल मीडियावर व्हायरल केला. लाइक्सचा खच पडला. तिच्या वडिलांनी शेवटी तिला आपल्या गावी पाठवून दिले.

विशेष लेख: माेनालिसा, सैफ असे राेज काेणीतरी हवेच...
निळू दामले , मुक्त पत्रकार|
सैफ अली खानवर हल्ला झाला. सोशल मीडियावर मजकूर पडू लागला. आपल्यावर नेमका कसा हल्ला झाला हे सैफलाही कळलं नव्हतं; पण या लोकांना ते माहीत होतं. हल्ला करणारा कोणत्या धर्माचा होता, त्याचा हेतू काय होता, तो आता कुठे पळालाय हे सारं सोशल मीडियाला माहीत होतं. हल्ला करणाऱ्यानंही कुठं जायचं ठरवलं नव्हतं; पण सोशल मीडिया २४ तास ॲक्टिव्ह असणाऱ्या माणसांना ते माहीत होतं. पोलिसांना तपासात जे जे सापडत नव्हतं ते ते सारं यांच्याजवळ होतं. या लोकांचे पत्ते गोळा करावेत. त्यांच्या हाती पोलिस खातं सोपवावं. कोर्टंही त्यांच्याच हाती सोपवावी. त्यांना जर थोडी अधिक संधी दिली तर ते गुन्हा व्हायच्या आधीच गुन्हेगाराचा शोध लावून, खटला चालवून, शिक्षा करून मोकळे होतील.
कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. मोनालिसा भोसले तिचे नाव. हेदेखील आम्हाला सोशल मीडियातून कळाले. उत्साही मोबाइल कॅमेरावाले तिथं पोहोचले. त्यांनी फोटो वेगवेगळ्या सोशल मीडियावर टाकले. ते फोटो व्हायरल झाले. हां हां म्हणता एक लाख लाइक्स, आणखी एक लाख लाइक्स, एक लाख शेअर.
तिच्याभोवती फोटो घेणाऱ्यांचा, तिच्याशी बोलणाऱ्यांचा गराडा. आपल्यापेक्षा पॉप्युलर होणारी ही कोण असा राजकारण्यांनाही प्रश्न पडला. पण तोवर ती मुलगीच वैतागली होती. सभोवतालच्या गराड्यामुळं तिचा व्यवसाय बसला, कोणी गिऱ्हाईक येईनात. तिच्या वडिलांनी शेवटी तिला दुःखी होऊन आपल्या गावी पाठवून दिले.
गांधीजी म्हणत की त्यांचं आयुष्य हे उघड्या पुस्तकासारखं आहे, आपण काहीही लपवून ठेवलेलं नाही.
गांधीजींचा आदर्श लोकांनी ठेवलाय. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपवर लोक आपलं आयुष्य टाकतात. मुलाचा सातवा वाढदिवस. आज घरात मिसळ कशी केलीय. आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस.
लग्नाचा वाढदिवस असं सांगताना पत्नीच्या खांद्यावर किंवा कंबरेमागं हात घालून काढलेला फोटो. सकाळपासून सर्दी खोकल्याचा कसा त्रास सुरू झालाय. डिप्रेशन आलंय. वगैरे. पुढाऱ्याचा जसा मिनिटवार कार्यक्रम असतो तशी कार्यक्रम पत्रिका. निवडणूक होते. निकाल पूर्णपणे लागलेला नसतो.
फेसबुकवर कोण मुख्यमंत्री होणार, कोणाकडं कोणतं खातं येणार इत्यादी इत्थंभूत माहिती येते. ज्यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी वा मंत्रिपदासाठी येतात त्यांची संख्या काही हजार होते. सरकार ही एक रोजगार योजना आहे की काय असं वाटावं इतके मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या संख्येवरून वाटावं. ती ती माणसं नावं वाचून काही काळ हवेत तरंगत असतील. सोशल मीडियात थोडा वेळ खर्च करा. भारत आता १०० टक्के साक्षर आणि सुजाण झालाय हे कळतं.
लोक सोशल मीडियातून ज्ञान गोळा करतात, त्यावर आपल्या विचारशक्तीचा संस्कार करून ते ज्ञान पुन्हा लाखो लोकांना सोशल मीडियातून देतात. जगातल्या प्रत्येक गोष्टींचं खडान् खडा ज्ञान त्यांच्याजवळ असतं. झोपेतला, आंघोळ करताना आणि संडासातला वेळ वगळता बाकीचा सर्व वेळ ते ज्ञान प्रसारासाठी वापरत असतात. शाळा, कॉलेज, शिक्षण खातं, प्रयोगशाळा, संशोधन संस्था इत्यादी गोष्टींची आता आवश्यकताच राहिलेली नाहीये हेही सोशल मीडियातल्या व्यवहारातून लक्षात येतंय. भारताची ही प्रगती पाहून ऊर भरून येतो.