"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:44 PM2024-01-01T13:44:30+5:302024-01-01T13:45:43+5:30
प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान रामललाचे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.
आचार्य सत्येंद्र दास गेल्या ३२ वर्षांपासून रामललाची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे नऊ महिने ते रामललाची पुजारी म्हणून पूजा करत होते. बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा आचार्य सत्येंद्र दास तिथे उपस्थित होते. त्यानंतर एका तंबूत रामलला विराजमान होते. यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं सत्येंद्र दास यांनी सांगितले.
रामललाची ही अवस्था भक्तांसाठी अत्यंत क्लेशदायक होती, परंतु कायदेशीर बंधनांमुळे भाविक इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. मी अनेकदा रामललासमोर रडत असे, असं सत्येंद्र दास म्हणाले. तसेच आता रामनगरीत सौभाग्याचा नवा सूर्य उगवत आहे. भव्य मंदिरात रामललाला विराजमान झालेले पाहण्याचा उत्साह इतका आहे की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही, अशी भावना देखील सत्येंद्र दास यांनी व्यक्त केल्या आहेत.
राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नाही-
भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.