दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो : पर्रीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 07:39 AM2017-09-08T07:39:49+5:302017-09-08T07:55:01+5:30
दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत काढले.
पणजी: दहा वर्षांनी राजकारणातून परतेन, असे वचन मी पत्नीला दिले होते; परंतु ती तत्पूर्वीच या जगातून निघून गेल्यामुळे राजकारणातच राहिलो, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत काढले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत ही मुलाखत झाली.
गोवा लोकमतचे संपादक राजू नायक यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची मुलाखत चांगलीच रंगली व तितकीच मुख्यमंत्र्यांच्या दिलखुलास उत्तरांमुळे हृदयस्पर्शीही ठरली. पर्रीकर हे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ राजकारणात व्यग्र असतात. माणसाला व्यक्तिगत जीवनही असते, यावर लक्ष वेधले असता, पर्रीकर म्हणाले, ‘माझा पिंड राजकारण्याचा नाही. राजकारण्याचा पिंड असता, तर मी दिल्लीत टिकलो असतो. कारण दिल्लीत खरं राजकारण होतं. माझी वृत्ती लोकसंपर्काची आहे. राजकारणातही मी फार काळ थांबण्यासाठी आलो नव्हतो. १० वर्षे राजकारण करणार आणि परतणार असे वचन मी तिला दिले होते, ती माझी पत्नी या जगातून निघून गेली. त्यामुळे राजकारणातच रमलो’.
यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्री बनलो; परंतु एकदाही कार्यकाल पूर्ण करता आला नाही. आता चौथ्यांदा तरी कार्यकाळ पूर्ण कराल काय, असे विचारले असता, ते म्हणाले की, कार्यकाळ अपूर्ण सोडण्याची इच्छा कोणालाच नसते. पहिल्यांदा विधानसभा बरखास्त केली ती पुन्हा सत्ता मिळणार या विश्वासानेच. दुसºयांदा राज्यपालांनी मला हटविले. तिसºयांदा मुख्यमंत्री बनलो, तेव्हा अर्ध्यावर सोडून दिल्लीला जावे लागले. आता चौथ्यांदा मात्र कार्यकाळ पूर्ण करीन, असा विश्वास वाटतो. राज्याच्या आर्थिक सामर्थ्याबद्दल विचारले असता पर्रीकर म्हणाले, राज्यात केवळ एकाच प्रकारच्या पर्यटनावर भर देणे योग्य ठरणार नाही. इव्हेंट टुरिझम ही संकल्पना लक्षात घेऊन गोव्यात अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरू केला. तसेच ग्रामीण पर्यटनावरही भर देण्यात आल्याचे ते म्हणाले.
मुलांना राजकारणात रस नाही! : आपल्या कुटुंबियांना राजकारणात उतरविण्याच्या प्रवाहाच्या विसंगत कल मुख्यमंत्र्यांनी दाखविला. आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात रस नाही. ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकºया भाजण्यासारखा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.’