‘मी पाहिलं, एका व्हिडीओमध्ये मी…’, PM मोदींनी Deepfake व्हिडीओबाबत व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:04 PM2023-11-17T16:04:31+5:302023-11-17T16:05:35+5:30
Narendra Modi : गेल्या काही दिवसांमध्ये काही प्रख्यात अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ समोर आले होते. तंत्रज्ञानाच्या या गैरवापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काही प्रख्यात अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ समोर आले होते. तंत्रज्ञानाच्या या गैरवापराबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी दिल्लीमध्ये भाजपाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये सांगितले की, डीपफेक भारतासमोरील सर्वात मोठ्या धोक्यापैकी एक आहे. त्यामुळे अराजक निर्माण होऊ शकते. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक व्हिडीओबाबत प्रसारमाध्यमांनी लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे, असे आवाहनही मोदींनी केलं आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले की, एआयमुळे आणि विशेषकरून डीपफेट व्हिडीओमुळे संकट येत आहे. या संकटाबाबत लोकांना जागरूक करता येऊ शकतं. आताच मी एक व्हिडीओ पाहिला. ज्यामध्ये मी गरबा खेळताना दिसत होतो. हे काय बनलंय, असं मला वाटलं. ही बाब खूप चिंतेचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हल्लीच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून खूप वादही झाला होता. अमिताभ बच्चन यांनीही याबाबत ट्विट करून कारवाईची मागणी केली होती. तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिचाही एक डीपफेक फोटो व्हायरल झाला होता. त्यामधून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी एकत्र फोटो काढल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र खऱ्या फोटोमध्ये सारासोबत तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर होता. मात्र डीपफेकद्वारे तिथे शुभमन गिलचा फोटो लावण्यात आला होता.
अभिनेत्री काजोल हिचाही एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तिला कपडे बदलताना दाखवण्यात आलं आहे. काजोलचा हा डीपफेक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.