केजरीवालांना 2 कोटी रूपये घेताना मी पाहिलं, कपिल मिश्रांचा खळबळजनक आरोप

By admin | Published: May 7, 2017 12:24 PM2017-05-07T12:24:15+5:302017-05-07T14:14:06+5:30

सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला

I saw Kejriwal getting Rs 2 crore, Kapil Mishra's gross charges | केजरीवालांना 2 कोटी रूपये घेताना मी पाहिलं, कपिल मिश्रांचा खळबळजनक आरोप

केजरीवालांना 2 कोटी रूपये घेताना मी पाहिलं, कपिल मिश्रांचा खळबळजनक आरोप

Next
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 7 -  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले आणि हे मी स्वतः पाहिलं असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.  मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
 
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले.
 
याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
 
दुसरीकडे, कपिल मिश्रांनी केलेले सर्व आरोप  निराधार आणि बिनबुडाचे असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ते फेटाळून लावले आहेत. 

 

Web Title: I saw Kejriwal getting Rs 2 crore, Kapil Mishra's gross charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.