'मी जय श्री राम म्हणतो, तुम्ही गोडसे मुर्दाबाद म्हणा', कुणाल कामराचे VHPला खुले पत्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:36 PM2022-09-11T18:36:17+5:302022-09-11T18:36:35+5:30
'मी हिंदू संस्कृतीचा अपमान केला नाही, अपमान केल्याची एखादी क्लिप असेल तर मला दाखवा.'
गुरुग्राम: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याचे वादाशी जुनेच नाते आहे. कथितरित्या सरकार आणि हिंदू धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अनेकदा त्याचे शो रद्द होतात. आता परत एकदा 17 आणि 18 सप्टेंबरला गुरुग्राम येथे होणारे शो रद्द करण्यात आले. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने त्याला विरोध केला होता. यानंतर आता कुणाल कामरानेट्विटरवर VHPसाठी एक पत्र जारी केले आहे. या पत्रात कामराने हिंदू देवांची खिल्ली उडवली नसल्याचा दावा केला आहे.
कुणाल कामराने पत्रात लिहिले की, ''आदरणीय हिंदू परिषद, मी तुमच्या नावासोबत विश्व लावले नाही, कारण मला वाटत नाही की, या जगातील हिंदूंनी तुम्हाला धर्माचा ठेका दिला आहे. तुम्ही गुरुग्राममध्ये होणारा माझा सो क्लबच्या मालकाला धमकी देऊन रद्द करायला लावला. त्या बिचाऱ्याला काय दोष द्यायचा, त्याला धंदा करायचा आहे, तो गुंडांशी कसा सामना करणार. तो पोलिसांत गेला, तर पोलीस तुमच्याकडे निवेदन घेऊन येईल. एकूणच काय तर सिस्टीम तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणता की, मी हिंदू संस्कृतीचा अपमान केला, पण मी अपमान केलेला नाही. अपमान केल्याची एखादी क्लिप असेल तर मला दाखवा. मी फक्त सरकारची खिल्ली उडवतो. तुम्ही सरकारचे पाळीव असाल तर तुम्हाला वाईट वाटेल."
मेरा जवाब @VHPDigitalpic.twitter.com/J9Ah8ad5ur
— Kunal Kamra (@kunalkamra88) September 11, 2022
"माझ्या आणि देवाच्या नातेसंबंधाची परीक्षा देणे मी आवश्यक वाटत नाही. पण तरीही मी परीक्षा देऊन तुमची परीक्षा घेतो. मी मोठ्याने आणि अभिमानाने जय श्री सीता राम आणि जय राधा कृष्ण म्हणतो. तुम्हालाही गोडसे मुर्दाबाद म्हणावे लागेल. असे नाही केले तर मी समजेल की, तुम्ही लोक हिंदुद्रोही आणि दहशतवादाला समर्थन करणारे आहात. तुम्ही गोडसेला देव तर मानत नाही ना? मानत असाल, तर यापुढेही माझे शो रद्द करत रहा. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू असण्याची परीक्षा मी जिंकली याचाच मला आनंद होईल.''
कामराचा गुरुग्राम शो रद्द
कुणाल कामराचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हरियाणातील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी निषेध केल्यानंतर आणि शोमध्ये व्यत्यय आणण्याची धमकी दिल्यानंतर, गुडगावमधील एका बारच्या व्यवस्थापनाने स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुनच हा वाद सुरू झाला आहे, अद्याप यावर विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.