आईशप्पथ! तरुणाच्या पोटातून काढले गर्भाशय; दुर्मीळ घटना, जगात केवळ ३०० उदाहरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:25 AM2023-10-03T06:25:19+5:302023-10-03T06:26:32+5:30
जगात कधी कोणते आश्चर्य घडेल, हे सांगता येत नाही. छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला असून एका २७ वर्षीय तरुणाच्या पोटात गर्भाशय असल्याचे निदान करण्यात आले.
रायपूर : जगात कधी कोणते आश्चर्य घडेल, हे सांगता येत नाही. छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला असून एका २७ वर्षीय तरुणाच्या पोटात गर्भाशय असल्याचे निदान करण्यात आले. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया करून ते काढण्यात आले. पुरुषांमध्ये गर्भाशय आढळणे ही दुर्मिळ घटना असून जगभरात आतापर्यंत केवळ ३०० उदाहरणांची नोंद आहे.
छत्तीसगडच्या कांकेर येथील तरुणाला अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. मांडीवर बरेच दिवस सूज होती. त्याला धमतरी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत हर्निया झाल्याचे निदान झाले. हर्नियाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना त्याच्या पोटात गर्भाशय आढळले. एवढेच नव्हे, तर अंडकोषही आढळले. शस्त्रक्रियेनंतर ते काढून टाकण्यात आले.
गर्भाशयासह पोटात फॅलोपियन ट्यूब
तरुणाच्या पोटात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब (नसबंदी करता येणारी नळी) आढळली. विशेष म्हणजे पोटात अंडकोषही आढळले. वैद्यकीय क्षेत्रात हे एक अत्यंत दुर्मीळ प्रकरण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
१९३९ मध्ये पहिला रुग्ण
जगात या आजाराच्या आतापर्यंत ३०० रुग्णांची नोंद झाली. प्रामुख्याने ८ महिने ते २७ वर्षे वयोगटातील पुरुषांचा त्यात समावेश आहे. इंग्लंडमध्ये १९३९ मध्ये पहिल्या रुग्णाची नोंद झाली.
काय आहे हा प्रकार?
वैद्यकीय परिभाषेत या आजाराला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम (पीएमडीएस) म्हणतात.
अँटी-मुलेरियन हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये महिलांचे अवयव विकसित होतात
जनुकांमधील उत्परिवर्तनीय बदलांमुळेही पुरुषांच्या शरीरात असे बदल दिसतात.
अशा प्रकरणात मुलांमध्ये अंडकोष नसणे, मांडीवर सूज येणे, लवकर वंध्यत्व येणे अशी लक्षणे दिसतात.