स्वयंघोषित 'कल्की भगवान' यांच्या आश्रमांवर छापा, 409 कोटींच्या संपत्तीवर टाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:03 PM2019-10-19T13:03:02+5:302019-10-19T13:22:50+5:30
प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला असून तब्बल 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला असून तब्बल 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: ला कल्की भगवान म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांवर छापा टाकण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये असलेल्या विविध आश्रमांवर छापा टाकण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत 40 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्की यांच्या नावावर एक विद्यापीठ आणि आध्यात्मिक शाळा देखील आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील वैरादेहपलेममध्ये त्यांचा मुख्य आश्रम आहे. बंगळुरू येथील आश्रमावर छापा टाकण्यात आल्यावर तब्बल 93 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तसेच इतर ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यामध्ये 409 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्की यांनी एलआयसीचा क्लार्क म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1989 मध्ये चित्तूर विजय कुमार यांनी आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केला आहे. यानंतर त्यांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांना 5 हजारापासून 25 हजारे रुपये खर्च करावे लागतात. तसेच त्यांच्या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात असून ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत.
भारतासोबतच कल्की यांच्या संस्थांनी चीन, अमेरिका, सिंगपूरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याजवळ बेहिशेबी मालमत्ता देखील मोठ्या प्रमाणात आहे. कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 40 हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये जवळपास 18 कोटी रुपयांचे परदेशी चलन, 88 किलो सोने-चांदीचे दागिने सापडले आहेत. दागिन्यांची किंमत ही जवळपास 26 कोटी आहे. 1271 कॅरेटचे म्हणजेच पाच कोटींचे हिरे देखील प्राप्तिकर विभागाला सापडले आहेत. का हिंदी वेबसाईटने याचे वृत्त दिले आहे.