'मला होळी साजरी करायची आहे, दया दाखवा'; लालू यादवांचं न्यायाधीशासमोर गा-हाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:22 AM2018-02-16T10:22:04+5:302018-02-16T10:46:10+5:30
कारागृहातच मकरसंक्रांती साजरी करावी लागलेल्या लालू प्रसाद यादव यांना आता होळीची चिंता लागली आहे.
रांची - चारा घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले लालू प्रसाद यादव दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होळी साजरी करतात. लालू प्रसाद यांची होळी पाहण्यासाठी त्यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. होळीला आता काही दिवस शिल्लक असताना लालू प्रसाद यादव मात्र अद्याप रांची कारागृहात बंद आहेत. कारागृहातच मकरसंक्रांती साजरी करावी लागलेल्या लालू प्रसाद यादव यांना आता होळीची चिंता लागली आहे. यावेळी कारागृहात चार भिंतीमध्ये होळी साजरी करावा लागू नये अशी भीती त्यांना सतावत आहे. आपल्यावरील खटल्यांची लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी करायला मिळावी अशी इच्छा लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारी 15 फेब्रुवारीला लालू प्रसाद यादव यांनी सीबीआयच्या न्यायाधीशांसमोर लवकरात लवकर सुनावणी पुर्ण करत निर्णय सुनावण्याची विनंती केली. न्यायालयात उपस्थित वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांनी सीबीआय न्यायाधीशांना होळीच्या आधी सुनावणी पुर्ण करा, म्हणजे किमान मला होळी तरी साजरी करायला मिळेल असं म्हटलं आहे. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनीदेखील लवकरात लवकर सुनावणी पुर्ण करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन दिलं आहे.
न्यायालयात लालू प्रसाद यादव यांनी खुलेपणाने न्यायाधीसांसमोर आपलं म्हणणं ठेवलं. यावेळी न्यायाधीशांनी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्याकडून चूक झाली, तुम्ही चांगले अधिकारी ठेवले नाहीत असं म्हटलं. यावर लालू यादव यांनी सिस्टीममध्येच गडबड आहे असं सांगितलं. यावर तुम्ही ठरवलंत तर सिस्टीम ठीक होईल असं उत्तर न्यायाधीशांनी दिलं. तुम्ही निर्णय दिला असल्या कारणाने तुमचं खूप नाव झालं आहे असा खोचक टोला लालूंनी न्यायाधीशांना लगावला. यावर न्यायाधीशांनी आपलं नाव झालेलं नाही, तुमच्यामुळे झालेलं आहे. यानंतर लालू यादव यांनी आता तरी दया दाखवा असं म्हटलं.
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.
चैबासा कोषागारातून १९९० मध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये ३७.६२ कोटी परस्पर काढल्याप्रकरणी यादव व मिश्रा यांना ५ वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा, तसेच लालू प्रसादना १० लाख रुपये, तर मिश्रा यांंना ५ लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आधीच्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यापासून लालू २३ डिसेंबरपासून तुरुंगात आहेत. दंड न भरल्यास लालू व मिश्रा यांना आणखी एक वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.