'मलाही हैदराबादसारखाच न्याय हवाय', उन्नाव पीडितेच्या वृद्ध बापाची आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:44 AM2019-12-07T11:44:54+5:302019-12-07T11:51:29+5:30
हैदराबादमधील पोलिसांनी जसं आरोपींना पाठलाग करुन गोळ्या घातल्या. त्याचप्रमाणे माझ्या मुलीवर
मुंबई - एकीकडे हैदराबादमध्ये डॉक्टरवरील बलात्काराच्या आरोपींचे एन्काऊंटर मीडियात चर्चेत होते, सोशल मीडियातून पोलिसांवर कौतुकांची फुले वाहिली जात होती. तर, त्याचवेळेस दुसरीकडे उन्नाव बलात्कार पीडितेला न्यायालयात जात असताना पेटवून देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडविली होती. या पिडीतेचा शुक्रवारी रात्री दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर, पीडितेच्या वडिलांना टाहो फोडला आहे.
उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.40 वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. तिला एअरलिफ्ट करत दिल्लीला हलविण्यात आले होते. 90 टक्के भाजलेली असूनही ती शुद्धीत होती. यावेळी तिने तिच्यासोबत असलेल्या भावाला मी वाचणार ना? मला मरायचे नाही, असे अश्रू ढाळत सांगितले होते. जवळपास 40 तास तिने मृत्यूशी झुंज दिली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांचे अश्रू थांबत नाहीत. रडतानाही पीडितेच्या वयोवृद्ध बापाने मलाही हैदराबादप्रमाणेच न्याय हवाय, अशी मागणी केलीय.
हैदराबादमधील पोलिसांनी जसं आरोपींना पाठलाग करुन गोळ्या घातल्या. त्याचप्रमाणे माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना गोळ्या घालाव्या, असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. माझ्या कुटुंबाला पैसा, अडका काहीच नको, आम्हाला फक्त न्याय हवाय. आरोपींना तात्काळ फाशी द्या, नाहीतर गोळ्या घालून ठार करा, अशी विनंतीच पीडित बापाने केलीय. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर या वृद्ध बापाने टाहो फोडला असून, त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. आमच्या कुटुंबावर खटला पाठिमागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली जातेय, असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या वडिलांना कुणीही मुलीच्या मृत्यूची माहिती दिली नाही. सकाळी वर्तमानपत्रातून त्यांना ही बातमी समजली. दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या गावाला कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.