विकृत नजरेची शिकार मीसुद्धा झाले होते, अहमदाबादच्या आयआयएममध्ये पूनम महाजन यांनी दिली नवी दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:57 PM2017-10-02T15:57:04+5:302017-10-02T16:56:04+5:30
उत्तर मुंबईच्या भाजपाच्या खासदार व दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
अहमदाबाद - उत्तर मुंबईच्या भाजपाच्या खासदार व दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अहमदाबादेत भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी ही खळबळजनक माहिती उघड केली आहे. त्या म्हणाल्या, विद्यार्थी दशेत असताना ज्यावेळी माझ्याजवळ दररोज कारनं जाण्यासाठी पैसे नसायचे, तेव्हा मी वरळी ते वर्सोवा ट्रेननं प्रवास करत होती.
माझ्याकडे ज्यावेळी वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं त्यावेळीसुद्धा मी स्वतःला हतबल समजत नव्हते. तसेच तुमच्याकडेसुद्धा कोणी वेगळ्या नजरेनं पाहिल्यास स्वतःला लाचार समजू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना दिला आहे. भारतात सर्वाधिक महिलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक भारतीय महिलेला चुकीच्या पद्धतीनं हात लावण्यात आला आहे. परंतु त्यावेळी स्वतःला लाचार समजत हतबल होऊ नका.
भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या ब्रेकिंग द ग्लास सीलिंग या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतीय महिलांच्या यशाचंही गुणगाण गायलं आहे. अमेरिकेत अद्यापपर्यंत कोणतीही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही, मात्र भारतीय महिलांना राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री सर्व पदे भूषवली आहेत. या महिलांनीच ग्लास सीलिंगला तोडलं आहे. कोणीही तुम्हाला छेडल्यास त्याच्या कानशिलात मारा, मात्र विचार करू नका. स्वतःला लाचार न समजणं तुमच्या हातात आहे. राजकारणात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उभ्या आहेत. महिला या सामान्य नाहीत, त्यांना ताकदीची गरज आहे. तसेच टीव्ही मालिकांच्या माध्यमातून महिलांची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. भारतीय बास्केटबॉल महासंघ(बीएफआय) अध्यक्षा झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. वडील प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्या भाजपात सक्रिय झाल्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करत उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला आहे.