'मी त्याला तेव्हाही घाबरत नव्हते, आणि आताही घाबरत नाही', राम रहीमचा बुरखा फाडणा-या तरुणीचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 14:26 IST2017-08-29T14:24:29+5:302017-08-29T14:26:40+5:30
'2009 मध्ये जेव्हा तो कोर्टरुममध्ये गुरमीत राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला तेव्हा तो कोर्टरुममध्ये उपस्थित होता. मी त्याला तेव्हाही घाबरले नव्हते आणि आत्ताही घाबरत नाही'

'मी त्याला तेव्हाही घाबरत नव्हते, आणि आताही घाबरत नाही', राम रहीमचा बुरखा फाडणा-या तरुणीचं उत्तर
चंदिगड, दि. 29 - '2009 मध्ये जेव्हा तो कोर्टरुममध्ये गुरमीत राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला तेव्हा तो कोर्टरुममध्ये उपस्थित होता. मी त्याला तेव्हाही घाबरले नव्हते आणि आत्ताही घाबरत नाही', असं बेधडक वक्तव्य राम रहीमचा बुरखा फाडणा-या तरुणीने केलं आहे. तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवत 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंदू वृत्तपत्राने या तरुणीशी बातचीत केली आहे. आपल्या नातेवाईकाच्या फोनवरुन तिने हिंदू वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.
तरुणीने न्यायासाठी तब्बल 15 वर्ष लढा दिला आहे. 2002 पासून ती पोलीस संरक्षणात आहे. 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासहित पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एक पत्र पाठवून एका साध्वीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली होती. यानंतर न्यायालयाने पत्राची दखल घेत सीबीआयला प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला होता.
सीबीआयने तपास करताना 18 महिलांनी राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी तयार केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी फक्त दोन महिलांनी न्यायालयात येण्याची तयारी दर्शवली. ज्यांच्यामुळे आज बलात्कारी राम रहीम कारागृहात आहे. 'मला आज न्याय मिळाला आहे', अशी प्रतिक्रिया या तरुणीने दिली आहे. सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
तरुणीच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी डेरा सच्चा सौदारच्या सिरसा येथील मुख्यालयातील असणा-या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. तरुणीचं लग्न झालं असून तिला दोन मुलं आहेत. तरुणीचा मोठा भाऊदेखील राम रहीमचा अनुयायी होता. '2002 मध्ये राम रहीमने त्याची हत्या केली. त्याने पाठवलेल्या पत्रामुळेच गुन्हा नोंद झाल्याचा संशय राम रहीमला होता. आपल्या बहिणीसोबत होत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याला मिळाली होती', असं नातेवाईकाने सांगितलं आहे.
सीबीआय हत्येचाही तपास करत असून 16 सप्टेंबर रोजी शेवटचा युक्तिवाद होणार आहे. तरुणीच्या वडिलांचा गतवर्षी मृत्यू झाला आहे. जेव्हा 2009 मध्ये तरुणीने न्यायालयात जाऊन आपला जबाब नोंदवला होता तेव्हा वडिल तिच्यासोबतच होते. 'ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तिने सुनावणीला हजेरी लावली. त्यानंतरच्या वडिलांनीच न्यायालयात हजेरी लावली. राम रहीमचे सुरक्षारक्षक शस्त्र घेऊन न्यायालयात येत असत. आम्हाला धमकावलं जात असे. आम्ही कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहोत असं सांगायचे', अशी माहिती नातेवाईकाने दिली आहे.