"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:52 IST2024-08-28T17:51:48+5:302024-08-28T17:52:38+5:30
"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार तथा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत यांनी पक्षाकडून मिळालेल्या सल्ल्यावर मौन सोडले आहे. कंगना रणौत यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते. तसेच तेथे बलात्कार आणि हत्या होत होत्या, असे कंगना यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानाशी भाजपने असहमती दर्शवत त्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.
इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या, "मला पक्ष नेतृत्वाने फटकारले आणि मला यात कोणतीही अडचण नाही. मी पक्षाचा शेवटचा आवाज आहे, असे मला वाटत नाही. असे मानायला मी एवढी वेडी अथवा मूर्खही नाही. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटते, जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."
शेतकरी आंदोलनासंदर्भात काय म्हणाल्या होत्या कंगना? -
भाजपच्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या होत्या, "शेतकरी आंदोलनाच्या काळात काय घडले, हे ससर्वांनीच बघितले आहे. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तेथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."
अशी होती भाजपची भूमिका -
कंगना रणौत यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, "शेतकऱ्यांबद्दल बोलणे हे कंगना यांचे काम नाही. कंगना यांचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहेत. कंगना रणौत यांनी अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळायला हवे.", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली होती.