"निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही," हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 09:08 AM2023-06-06T09:08:19+5:302023-06-06T09:11:02+5:30
हेमा मालिनी या दोन वेळा मथुरेतून निवडून आल्या आहेत.
मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. जर आपल्याला पुढील निवडणूक लढवायची असेल तर ती मथुऱ्यातूनच लढवू अन्य कोणत्याही जागेवरून लढवणार नाही, असं वक्तव्य त्यांनी सोमवारी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. अन्य कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असेल तर तो आपण स्वीकार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
"जर आपण निवडणूक लढवावी असं पक्षाला वाटत असेल तर त्यात कोणतीही समस्या नाही. आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांवर अपार प्रेम आहे आणि त्यांची सेवा करायची आहे," असं हेमा मालिनी म्हणाल्या. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या ९ वर्षांमध्ये केलेल्या कार्याच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन वेळा विजय
हेमा मालिनी यांनी भाजपच्या तिकिटावर २०१४ आणि २०१९ मध्ये मथुरा लोकसभेच्या जागेवरून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी आरएलडी नेते जयंत चौधरी यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. २००३ आणि २००९ दरम्यान त्या राज्यसभेच्या सदस्यही होत्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपनं आपल्या मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशातील एकूण ८० जागांपैकी ७३ जागांववर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला दोन आणि समाजवादी पक्षाला पाच जागांवर विजय मिळाला होता.