भारताला 'प्रेमपत्र' लिहिणे सुरुच ठेवणार, 'टू इंडिया' वादावर वीर दासचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:53 AM2021-11-22T11:53:48+5:302021-11-22T12:03:28+5:30
वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये सादर केलेल्या कवितेवरुन वीर दासवर टीकेची झोड उठत आहे.
नवी दिल्ली: वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या 'टू इंडिया' या कवितेवरुन तीव्र टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. 'विनोद करणे हे माझे काम आहे आणि जोपर्यंत विनोद करण्यास सक्षम असेल, तोपर्यंत भारताला 'प्रेमपत्र' लिहीत राहीन', असे मत वीर दासने व्यक्त केले आहे.
वीर दासने मागच्या आठवड्यात यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू मांडल्या. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर भारताचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आणि त्याच्या या कवितेचा जोरदार विरोध केला. या वादानंतर पहिल्यांदाच वीर दासने समोर येऊन आपले मत मांडले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मी माझे काम करण्यासाठी येथे आलो आहे आणि पुढेही काम सुरुट ठेवेल. माझे काम लोकांना हसवणे आहे आणि जर तुम्हाला ते विनोदी वाटत नसेल तर हसू नका. ती कविता म्हणजे व्यंग होते आणि माझा विश्वास आहे की, सेंस ऑफ ह्यूमर असलेल्या कोणत्याही भारतीयाला या कवितेमागची विनोदाची भावना समजेल.'
तो पुढे म्हणतो की, 'मला वाटत की, विनोद एखाद्या सणासारखा असतो. जेव्हा एका खोलीत बसलेले शेकडो लोक हसतात आणि टाळ्यांचा आवाज येतो तेव्हा तो गर्वाचा क्षण असतो. मला वाटतं की, ज्याला विनोद कळतो आणि ज्याने माझा तो संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, त्याला त्यामागची भावना समजेल. एक कलाकार म्हणून मला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात, लाखो लोकांनी माझे कौतुक केले आहे. मी टीकेकडे गांभीर्याने पाहत नाही, माझ्यासाठी कौतुक महत्वाचं आहे.'
व्हिडिओमध्ये काय आहे ?
अमेरिकेतील केनेडी सेंटरमध्ये अभिनेता-कॉमेडियन वीर दासने एक कविता सादर केली होती. त्यात त्याने भारताच्या दोन बाजू दाखवल्या. यामध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारापासून शेतकऱ्यांचे आंदोलन आणि प्रदूषणासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. यात काही वादग्रस्त विषयांचाही उल्लेख आहे. त्याच्या या व्हिडिओनंतर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्याचे कौतुक करत आहेत.