प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू; दिवाकर रावतेंचा अजब पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:23 AM2019-09-18T06:23:19+5:302019-09-18T06:24:16+5:30
गडकरी यांच्या कारचा नंबर देऊन महाराष्ट्रातून पीयूसी मिळविण्याची हिंमतच कशी झाली?
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्या कारचा नंबर देऊन महाराष्ट्रातून पीयूसी मिळविण्याची हिंमतच कशी झाली? असे सांगत, प्रमाणपत्र मागणा-या व्यक्तींवर कारवाई करा, असा उफराटा आदेश महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी दिला. पीयूसीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याची सरकारची भूमिका आश्चर्यकारक आहे.
‘लोकमत’ने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कारचे पुणे, नागपूर आणि चंद्रपूर येथून पीयूसी प्रमाणपत्र मिळविले. गडकरी प्रदूषणाबाबत जागरूक आहेत, परंतु महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणारी केंद्रेच नियम पाळत नाहीत.
वाहन न तपासताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले. रावते यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात बोगस प्रमाणपत्रे दिली जातात, यापेक्षा रावते अस्वस्थ झाले, मंत्र्यांच्या कारचा नंबर देऊन पीयूसी मिळविल्याबाबत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ज्या पीयूसी केंद्रांकडून प्रमाणपत्र जारी झाली, त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा नंबर देऊन प्रमाणपत्र मागण्याचे धाडस करणाºयांवरही गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुमची यंत्रणा सदोष आहे, असे वाटत नाही? असे विचारता ते म्हणाले की, ते आम्ही तपासून घेऊ. काही सेंटर्सनी कार न तपासता प्रमाणपत्र दिले, याचा अर्थ संपूर्ण राज्यात असेच होते, असे म्हणता येणार नाही.
>पुणे, चंद्रपूर येथे कारवाई!
पुणे आणि चंद्रपूर येथून ज्या केंद्रांनी पीयूसी प्रमाणपत्र जारी केली, ती केंद्रे परिवहन विभागाने सील केली आहेत, तसेच नागपूर येथेही छापे पडले आहेत.