राम मंदिरासाठी जागा, सोन्याची वीट देईन; मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:30 AM2019-08-19T04:30:58+5:302019-08-19T04:35:02+5:30
अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे.
हैदराबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा आम्हाला दिली तर आम्ही तेथे श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट देऊ, अशी तयारी हैदराबादमध्ये राहणाऱ्या मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाने दर्शविली आहे.
दिल्लीचे शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे सहाव्या पिढीतील ५० वर्षांचे वंशज हबिबुद्दीन तुकी म्हणाले की, अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन व शिवाय मंदिरासाठी सोन्याची वीटही देईन. तुकी यांनी असाच प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्येही केला होता.
अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. तुकी म्हणाले की, न्यायालयापुढे असलेल्या कोणाही पक्षकाराकडे अयोध्येतील त्या जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत; पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे.
वादग्रस्त जागेवर हक्क दाखविणारे दस्तावेज आपल्यापाशीही नाहीत, हे मान्य करून तुकी म्हणाले की, पण मुघल शासकांचा वंशज
या नात्याने माझ्या हक्काच्या
दाव्याला निदान विश्वासार्हता तरी आहे. दरवर्षी आग्रा येथे शहाजहाँ बादशहाचा उरूस भरतो तेव्हा ताजमहालाच्या कोठीचे दरवाजे मीच उघडतो यावरून मी मुघलांचा मान्यताप्राप्त वंशज असल्याचेच सिद्ध होते, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भावनांचा आदर करायला हवा
तुकी यांच्या म्हणण्यानुसार पहिला मुघल बादशहा बाबर याने सन १५२९ मध्ये सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी यासाठी अयोध्येत ही मशीद बांधली. ती मशीद फक्त सैन्यासाठी होती व तेथे अन्य कोणीही जाऊ शकत नसे. ते म्हणाले की, मशीद बांधण्यापूर्वी त्या जागेवर नेमके काय होते, या वादात मला पडायचे नाही; पण ती जागा हे श्री रामाचे जन्मस्थान असल्याचे सांगून समाजाचा एक वर्ग त्यावर दावा करीत असल्याने मला त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.