ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 06:57 PM2024-05-17T18:57:15+5:302024-05-17T18:58:57+5:30
Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे शुक्रवारी धमकीचे पोस्टर सापडले आहेत.
हावडा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे, पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे शुक्रवारी धमकीचे पोस्टर सापडले आहेत. पांढऱ्या कापडाच्या तुकड्यावर हिरव्या शाईने हाताने लिहिलेले पोस्टर उलुबेरियाच्या फुलेश्वर भागातील एका बांधकामाच्या जागेवरून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना गाडीने धडक देऊन ठार करीन. यानंतर सर्वजण दिवे लावतील. माझ्याकडे एक गुप्त पत्र आहे, असे असे बंगाली भाषेत पोस्टरवर लिहिलेले आहे. दरम्यान, विटांच्या ढिगाऱ्यावर पोस्टर लटकलेले आढळले. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त पत्राचा अर्थ काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा एक खोडसळपणा असू शकतो. यात कोणी एक व्यक्ती किंवा गट सहभागी होता का, याचा शोध घ्यावा लागेल.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी सरकार आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा आणि विविध मागासलेल्या समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. टीएमसीचे झारग्राम लोकसभा उमेदवार कालीपदा सोरेन यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. भाजपाचे उद्दिष्ट एनआरसी लागू करून आदिवासींना उखडून टाकणे आहे आणि शेवटी त्यांना त्यांच्या जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवणे आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
१८ जागांवर मतदान पार पडलंय!
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. त्यापैकी १८ जागांवर चार टप्प्यात मतदान झाले आहे, तर २४ जागांवर तीन टप्प्यात मतदान होणे बाकी आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. टीएमसी, भाजपा, माकप आणि काँग्रेस निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.