मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा; म्हणाले, "दोन दिवसात मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 12:32 PM2024-09-15T12:32:38+5:302024-09-15T12:59:28+5:30

जामीनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली.

I will resign from the CM chair after two days Arvind Kejriwal big announcement | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा; म्हणाले, "दोन दिवसात मी..."

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा; म्हणाले, "दोन दिवसात मी..."

CM Arvind Kejriwal :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्थींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांत आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली. दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या, असेही ते म्हणाले.

"आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार… मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार? मित्रांनो, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत. देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

"मला तुरुंगात विचार करायला आणि पुस्तकं वाचायला भरपूर वेळ मिळाला. या काळात मी गीता अनेक वेळा वाचली. आज मी तुमच्यासमोर एक पुस्तक आणले आहे, ज्याचे नाव आहे 'भगतसिंग जेल डायरी'. भगतसिंग यांनी तुरुंगात अनेक पत्रे लिहिली. भगतसिंग यांच्या हौतात्म्याला ९५ वर्षांनंतर एक क्रांतिकारी मुख्यमंत्री तुरुंगात गेला. नायब राज्यपालांना तुरुंगातून एकच पत्र लिहिले. मी १५ ऑगस्टपूर्वी पत्र लिहून आतिषींना ध्वजारोहण करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ते पत्र नायब राज्यपालांना देण्यात आले नाही आणि मला ताकीद देण्यात आली होती की, मी पुन्हा पत्र लिहिल्यास कौटुंबाला भेटायचे बंद केलं जाईल. इंग्रजांनाही वाटले नसेल की स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर त्यांच्यापेक्षा क्रूर सत्ताधारी या देशावर येतील," असंही केजरीवाल म्हणाले.

महाराष्ट्रासह निवडणुका घ्या - मुख्यमंत्री केजरीवाल

"जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू राम १४ वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा माता सीतेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील नाव निश्चित होणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील स्वतःची काळजी तेव्हाच घेतील जेव्हा दिल्लीची जनता प्रामाणिक आहे असे म्हणेल. आम्ही दोघे तुमच्यामध्ये येऊ. तुम्ही प्रामाणिक आहात, असे जनतेने सांगितले तर आम्ही या खुर्चीवर बसू. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, जर मी प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मत देऊ नका," असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

Web Title: I will resign from the CM chair after two days Arvind Kejriwal big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.