"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:10 AM2024-07-04T10:10:59+5:302024-07-04T10:18:07+5:30
चोरट्याने काही रोकड लंपास केली. मात्र याच दरम्यान सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण चोरीची घटना जरी सामान्य वाटत असली तरी पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे.
तामिळनाडूमध्ये एका रिटायर्ड शिक्षकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने काही रोकड लंपास केली. मात्र याच दरम्यान सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण चोरीची घटना जरी सामान्य वाटत असली तरी पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये चोराने चोरी नेमकी का केली यामागचं कारण सांगितलं आहे. तसेच रिटायर्ड शिक्षकाला एक वचन देखील दिलं आहे.
७९ वर्षीय चितिराय सेलविन तामिळनाडूच्या तूतिकोरीन जिल्ह्यात राहतात. त्यांची पत्नीही रिटायर्ड टीचर असून दोघांना चार मुलं आहेत. १७ जून रोजी वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलाच्या घरी निघून गेले होते. मंगळवारी मोलकरीण घरी पोहोचली तेव्हा तिला घरामध्ये चोरी झाल्याचं लक्षात आले. तिने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता ६० हजार रुपये रोख, दोन सोन्याचे कानातले आणि काही चांदीचे दागिने गायब असल्याचं आढळून आलं. पोलिसांना येथे एक चिठ्ठीही सापडली, ज्यामध्ये चोरट्याने लुटलेली रक्कम महिनाभरात परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. "मला माफ करा. मी हे सर्व एका महिन्यात परत करेन. घरी कोणीतरी आजारी आहे" असं चोराने चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.