गरीब, वंचितांचे प्रतिबिंब माझ्यात दिसेल, राष्ट्रपती मुर्मू यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:44 AM2022-07-26T05:44:18+5:302022-07-26T05:45:14+5:30
द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार; युवक, महिलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील वंचित, गरीब, दलित, आदिवासींना माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसू शकेल आणि ही मला अतिशय समाधान देणारी बाब आहे. देशातील युवक, महिलांच्या हिताला राष्ट्रपती या नात्याने मी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान स्थितीत भारत प्रत्येक क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पहिल्या भाषणात काढले.
१५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींना आपल्या भाषणात वंदन केले. त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यसेनानींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देशाने आता ‘सबका प्रयास’ व ‘सबका कर्तव्य’ या दोन गोष्टींचा अंगीकार करीत वेगाने पुढे गेले पाहिजे. द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला आलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी आपल्या भाषणात या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव सुरू असतानाच्या काळात राष्ट्रपतिपदी निवड झाली हे माझे भाग्य आहे.
‘हे’ तर भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य
n द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, मी एका लहान आदिवासी खेड्यात वाढले. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणे हेसुद्धा स्वप्नवत होते.
n महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मी त्या खेड्यातील पहिली व्यक्ती होते.
n अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची राष्ट्रपतिपदी निवड होणे हे भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्यामुळेच शक्य झाले.
n अशा प्रगतिशील देशाचे नेतृत्व करायला मिळाले याचा मला अभिमान वाटतो.
नव्या राष्ट्रपतींचा आहार काय?
द्रौपदी मुर्मू या शाकाहारी आहेत. सकाळी नाश्त्यासाठी जे काही घरी तयार केले जाते ते त्या खातात. काही ड्रायफ्रूट्स त्याच्या नाश्त्यात असतात. दुपारी भात, भाजी, रोटी त्या खातात. रात्री एखादे फळ आणि हळद दूध घेतात. मुर्मू या अतिशय छान स्वयंपाक करतात, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. द्रौपदी या वाचन आणि लेखनात चांगल्या, तितक्याच त्या स्पष्टवक्ताही होती. मुलींमध्ये भांडण झाले की त्या स्वत:च सोडवण्यासाठी यायच्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
द्रौपदी मुर्मू यांचा जीवनपट
१९५८
२० जून रोजी ओडिशातील
मयूरगंज येथे जन्म
१९७९-८३
जलसिंचन, विद्युतपुरवठा विभागात ज्युनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत
१९९४-९७
ऑनररी अस्टिस्टंट टीचर म्हणून काम
१९९७
पहिल्यांदा निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी बनल्या.
२०००
विधानसभा निवडणुकीत विजयी, राज्यमंत्रिपदाची मिळाली जबाबदारी
२००६
भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या.
२००९
रायरंगपूर येथून दुसऱ्यांदा आमदार
२०१५
झारखंडच्या राज्यपालपदी निवड
२०२२
देशाच्या पहिल्या आदिवासी
महिला राष्ट्रपती