मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:49 PM2024-11-28T15:49:04+5:302024-11-28T15:49:33+5:30
बांगलादेशातील इस्कॉनशी संबंधीत चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या अटकेनंतर ममता यांनी भारतातील इस्कॉन प्रमुखांशी चर्चा केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भर विधानसभेत मोठी घोषणा करून टाकली आहे. मी मोदी सरकारसोबत उभी असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर ममता यांचे हे वक्तव्य आले आहे.
जेव्हा दुसऱ्या देशांची गोष्ट येईल तेव्हा आम्ही केंद्र सरकारसोबत उभे ठाकणार अशी माझ्या पक्षाची निती आहे. जर कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार होतो तर आम्ही त्याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करतो. जर बांगलादेशात कोणत्याही धर्मावर अत्याचार होत असले तर आम्ही त्याचे समर्थन करू शकत नाही, असे ममता म्हणाल्या आहेत.
बांगलादेशातील इस्कॉनशी संबंधीत चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या अटकेनंतर ममता यांनी भारतातील इस्कॉन प्रमुखांशी चर्चा केली. ही दुसऱ्या देशातील घटना असल्याने यावर केंद्र सरकारने योग्य कारवाई करायला हवी, आम्ही यासाठी केंद्र सरकारसोबत आहोत, असे ममता यांनी स्पष्ट केले.
'संमित सनातनी जोत' या हिंदू गटाचे नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना बांगलादेश पोलिसांनी सोमवारी ढाक्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. यानंतर बांगलादेशात हिंसा भडकली होती. दास यांना तुरुंगात पाठवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात चितगावमधील सैफुल इस्लाम या वकीलाला आपला जीव गमवावा लागला. यासाठी अनेकांनी इस्कॉनकडे बोट दाखवले आहे. हिंसाचारानंतरच इस्कॉनवर बंदीचा अर्जही कोर्टात देण्यात आला होता. बांगलादेश सरकारनेही कोर्टात इस्कॉनला 'कट्टरवादी संघटना' म्हटले आहे.