महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीन -भागवत कराड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:10 AM2021-08-11T06:10:41+5:302021-08-11T06:10:59+5:30
लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी सायंकाळी नॉर्थ ब्लॉक येथे डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. दर्डा यांनी कराड यांना त्यांच्या हातून लोकसेवेचे सर्वोत्तम कार्य होवो यासाठी शुभेच्छा दिल्या.
- विकास झाडे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून 'वित्त विभागाची' मोठी जबाबदारी सोपविली आहे, या संधीचे मी नक्कीच सोने करेन. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी सायंकाळी नॉर्थ ब्लॉक येथे डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. दर्डा यांनी कराड यांना त्यांच्या हातून लोकसेवेचे सर्वोत्तम कार्य होवो यासाठी शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीत डॉ. कराड यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या राजकारणातील चढत्या आलेखात त्यांनी अनेकांचे आशीर्वाद आणि स्नेह असल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. कराड म्हणाले, बँकिंग, इन्शुरन्स, डिसइन्व्हेस्टमेंट आदी महत्त्वाची जबाबदारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी माझ्यावर सोपविली आहे.
महाराष्ट्रात मागासलेल्या विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात कशी गुंतवणूक करता येईल हे माझे प्राथमिक विषय असतील. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी हिताचा सातत्याने विचार केला आहे. शेतकऱ्यांना विम्याचा अधिक लाभ मिळायला पाहिजे. मी अशा भागातून आलो आहे की तेथील शेतकरी, कष्टकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे.