पती शहीद झाल्यानंतर दोन दिवसांनी पत्नीने दिला मुलीला जन्म, म्हणाली पतीप्रमाणे हिलाही लष्करात पाठवेन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:15 PM2018-10-23T21:15:35+5:302018-10-23T21:19:40+5:30
जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ शनिवारी झालेल्या चकमकीत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. -
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ शनिवारी झालेल्या चकमकीत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले होते. या तीन जवानांमध्ये लान्स नायक रंजित सिंह भुतियाल यांचाही समावेश होता. दरम्यान, रंजित सिंह यांच्या मृत्युनंतर दोन दिवसांनी त्यांची पत्नी शिंपू देवी हिने सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी "आपल्या मुलीनेही लष्करात जावे आणि वडलांप्रमाणेच देशसेवा करावी," अशी इच्छा या वीरपत्नीने पतीच्या निधनाचे दु:ख असतानाही व्यक्त केली.
#JammuAndKashmir: A day after soldier Ranjit Singh Bhutyal lost his life in an attack by Pakistan intruders, his wife Shimpu Devi gave birth to a baby girl in Ramban. She says "I wish my daughter too joins the Indian army and serves the nation like her father." pic.twitter.com/uHKjP63zJ4
— ANI (@ANI) October 23, 2018
रामबन येथे मुलीला जन्म दिल्यानंतर ही वीरपत्नी म्हणाली की, माझ्या मुलीने लष्करात जाऊन आपल्या वडलांप्रमाणेच देशसेवा करावी, असे मला वाटले. शनिवारी सुंदरबनी येथे झालेल्या चकमकीत रंजित सिंह यांच्यासोबतच हवालदार कौशल कुमार आणि रायफलमॅन रजत कुमार यांनाही वीरमरण आले होते.
शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी विभागात हत्यारबंद दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी उडालेल्या चकमकीत जवानांनी दोन घुसखोरांना ठार मारले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. तसेच या चकमकीत सेनेचे तीन जवान शहीद झाले होते.