आयएएफ अधिकाऱ्याला चिरडले
By admin | Published: January 14, 2016 02:04 AM2016-01-14T02:04:06+5:302016-01-14T02:04:06+5:30
लोखंडी कठडे तोडून आत घुसलेल्या एका भरधाव कारने प्रजासत्ताक दिन परेडच्या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला चिरडले.
कोलकाता : लोखंडी कठडे तोडून आत घुसलेल्या एका भरधाव कारने प्रजासत्ताक दिन परेडच्या रंगीत तालमीत सहभागी झालेल्या एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला चिरडले. ही घटना बुधवारी सकाळी कोलकाता येथे घडली. राजदचे माजी आमदार मोहम्मद सोहराब यांचा मुलगा ही कार चालवित होता.
परेड सुरू असल्याने कोलकाता येथील रेड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सकाळी ६.३० च्या दरम्यान नवीकोरी पांढरी आॅडी कार रस्त्यावर लावलेले तिन्ही लोखंडी कठडे तोडून परेड सुरू असलेल्या ठिकाणी घुसली. यावेळी परेडची देखरेख करीत असलेले एयर फोर्स ड्रिल प्रशिक्षक कार्पोरल अभिमन्यू गौड (२१) यांना कारने चिरडले. या अपघातात गौड गंभीर जखमी झाले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना लगेच ईस्टर्न कमान रुग्णालयात हलविले. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परेड सुरू असताना हा मार्ग सकाळी कठडे लावून बंद ठेवला जातो. परंतु ही आॅडी कार अतिशय वेगात आली आणि तिन्ही कठडे तोडून परेडमध्ये घुसली. यावेळी गौड यांना चिरडतच कार सुसाट वेगाने पुढे गेली आणि पुढे काही अंतरावर लावलेल्या दुसऱ्या एका कठड्याला धडकल्यानंतर थांबली. यानंतर चालक कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला.
ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे स्पष्ट करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताला जबाबदार असलेल्या कार चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. बॅनर्जी यांनी गौड यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. परेड सुरू आहे आणि कठडे लावून रस्ताही बंद करण्यात आला आहे, हे माहीत असतानाही कार चालकाने कार आत घातली. कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे बॅनर्जी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
अद्याप कोणालाही अटक नाही
या संदर्भात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी कार विकणाऱ्या आॅडीच्या शोरूममध्ये रेकॉर्डची तपासणी केली असता ही कार राजदचे माजी आमदार मोहम्मद सोहराब यांच्या नावावर पंजीकृत केल्याचे आणि सोहराब यांचा पुत्र अम्बिया सोहराब याने ती ९० लाखांत विकत घेतल्याचे समजले.
ही कार अम्बियाने ४ जानेवारीलाच ताब्यात घेतली होती. घटनेनंतर पोलिसांनी सोहराब यांच्या घरी धडक दिली. पण त्यांना घराला कुलूप लावलेले दिसले.
कार नेमके कोण चालवित होता, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.