शत्रूंचं आता काही खरं नाही, भारतीय वायुदलात 324 तेजस लढाऊ विमानांचा होणार समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 08:26 AM2018-03-15T08:26:43+5:302018-03-15T08:26:43+5:30
शत्रूंना आता सावध होण्याची वेळ आली आहे कारण भारतीय वायुदलाच्या ताफ्यामध्ये 324 (मार्क II) तेजस लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे.
नवी दिल्ली - शत्रूंना आता सावध होण्याची वेळ आली आहे कारण भारतीय वायुदलाच्या ताफ्यामध्ये 324 (मार्क II) तेजस लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 123 तेजस विमानांचा वायुदलाच्या ताफ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या विमानांची किंमत 75 हजार कोटी रुपये आहे. दरम्यान, वायुदलाने 201 तेजस- मार्क टू या नवीन लढाऊ विमानांचा ताफ्यात समावेश करण्यासाठीही सहमती दर्शवली आहे. या लढाऊ विमानांमधील रडार, शस्त्रास्त्र आणि इंजिन यांची क्षमता पूर्वीच्या विमानांपेक्षा अधिक असून शत्रूला नेस्तनाबूत करण्यास कामी येणार आहे. सध्या तेजस विमान 350 ते 400 किलोमीटरच्या परिसरात एक तासापर्यंत सक्रिय राहू शकते आणि 3 टन शस्त्रास्त्र वाहून नेण्याची विमानाची क्षमता आहे. या विमानाच्या तुलनेत इतर सिंगल इंजिन विमानांचा विचार केला तर स्वीडनचे ग्रिपन-ई आणि अमेरिकेचे एफ-16 हे जास्त क्षमतेने काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस मार्क II आता विकास प्रक्रियेत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत बोलताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, तेजस विमानात महत्त्वाचे बदल करून ते अत्याधुनिक करण्यात येतील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दरम्यान, भारतीय वायुदलाने ऑर्डर केलेल्या 20 तेजस विमानांपैकी केवळ 6 विमानांना इनिशिअल ऑपरेशनल क्लिअरन्स मिळाला आहे.