‘गुंजन सक्सेना’ चित्रपटातील दृश्यांना हवाई दलाचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:07 AM2020-08-13T03:07:42+5:302020-08-13T03:08:52+5:30
चित्रपटाचे ट्रेलर अलीकडेच प्रसिद्ध झाले असून, प्रत्यक्ष चित्रपट ‘ओटीटी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित व्हायचा आहे
नवी दिल्ली : करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या ‘गुंजन सक्सेना : दी कारगिल गर्ल’ या आगामी चित्रपटातील काही दृश्ये व संवाद भारतीय हवाई दलाबद्दल समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण करणारे असल्याने ते वगळण्यात यावेत, अशी मागणी हवाई दलाने केली आहे.
या चित्रपटाचे ट्रेलर अलीकडेच प्रसिद्ध झाले असून, प्रत्यक्ष चित्रपट ‘ओटीटी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित व्हायचा आहे. संपूर्ण चित्रपट आणि त्याचे ट्रेलर हवाई दलाने प्रसिद्धीपूर्व पाहणीसाठी मागवून घेतले होते. ते पाहिल्यानंतर हवाई दल मुख्यालयाने चित्रपटाची ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ ही निर्माती कंपनी, ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डास पत्र पाठवून आपले आक्षेप कळविले आहेत. आपल्या मते चित्रपट व त्याच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये व संवादांची सविस्तर यादी पत्रासोबत जोडून ते काढून टाकण्याची मागणी हवाई दलाने केली आहे. हवाई दल या पत्रात म्हणते की, चित्रपटात भारतीय हवाई दलाची वास्तव प्रतिमा दाखविली जाईल व ज्यातून भावी पिढ्यांना स्फूर्ती मिळेल, असा आशय समाजापुढे ठेवण्याचे प्रयत्न केले जातील, असे ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ने म्हटले होते.
आधी झालेल्या चर्चेत कबूल केले होते; परंतु तयार झालेला चित्रपट व त्याचे ट्रेलर पाहता निर्मात्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे दिसते. काही दृश्ये व संवादांमध्ये हवाई दलास निष्कारण नकारात्मक स्वरूपात दाखविण्यात आले आहे.
माजी प्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या चित्रपटातील पात्राचे व्यक्तिमत्त्व अधिक उजळ करण्यासाठी काही दिशाभूल करणारी दृश्ये दाखविण्यात आली आहेत व त्यातून खासकरून महिलांना हवाई दलात दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे अयोग्य चित्र रंगविण्यात आले आहे. वास्तव असे आहे की, हवाई दलात लैंगिक भेदभाव कधीही केला जात नाही व पुरुष आणि महिला या दोघांनाही समान संधी दिल्या जातात.
कात्रीऐवजी खुलाशाची तळटीप
हवाई दल म्हणते की, चित्रपटाच्या निर्मात्यांना आम्ही हे आक्षेप कळविले व आक्षेपार्ह दृश्ये व संवाद वगळण्याची सूचना केली; परंतु तसे न करता त्यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीची योजना तयार केली व ‘कथानक व त्यातील पात्रे काल्पनिक आहेत’, अशी तळटीप टाकून चित्रपट प्रदर्शनाची तयारी सुरू केली. केवळ अशी तळटीप टाकून चित्रपटातून समाजापुढे जाणारी हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा पुसली जाणार नाही.