IANS- C Voter Survey: महागाईवर पहिल्यांदाच सी-व्होटरचा सर्व्हे आला; लोक त्रासलेत, खर्च प्रचंड वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:04 AM2022-05-21T08:04:58+5:302022-05-21T08:05:25+5:30
या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
निवडणुका आल्या की कोण जिंकणार, कोण हरणार याचा सर्व्हे करणाऱ्या संस्था आता महागाईवरही सर्व्हे करू लागल्या आहेत. आयएएनएस-सी व्होटरने या वाढलेल्या महागाईवर सर्व्हे केला आहे. यामध्ये भारतीय कुटुंबे या वाढलेल्या महागाईने त्रस्त झाली असल्याचे समोर आले आहे.
सी व्होटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसेच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये हा विशेष सर्व्हे करण्यात आला. या राज्यांमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
या राज्यांच्या राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. २०२१ नंतर निवडणुका झाल्यावर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आसामच्या ५१ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न कमी झाले आहे. ९ टक्के लोकांनी म्हटले की त्यांचे उत्पन्न स्थिर राहिले आहे मात्र खर्च वाढला आहे. अन्य राज्यांच्या नागरिकांची परिस्थिती काही वेगळी नाहीय. प. बंगालच्या ४६.६ टक्के लोकांनी म्हटले की गेल्या वर्षभरात कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे, तर खर्च वाढला आहे. तर ३१ टक्के लोकांनी उत्पन्न तसेच असून खर्च वाढल्याचे म्हटले आहे.
दक्षिणेतील मतदारांनीदेखील याच गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. केरळच्या ३९ टक्के मतदारांनी म्हटले की त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नात घट झाली आहे, परंतू कौटुंबीक खर्च वाढला आहे. ३४ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून खर्च वाढला आहे. तामिळनाडूमध्ये ३९ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न घटले आहे. ३५ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून कौटुंबीक खर्च वाढल्याचे समोर आले आहे.