प्रेरणादायी! गावोगाव फिरून कपडे विकून वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:29 PM2023-02-14T12:29:08+5:302023-02-14T12:39:43+5:30
ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला ते अत्यंत गरीब होते. घराला नीट छप्परही नव्हते.
जिथे चांगले शिक्षण नाही, चांगल्या सुविधा नाहीत, चांगली नोकरी नाही, अशा गावातील लोक स्पर्धा परीक्षा कशी पास करतात हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण स्वतःवरचा दृढ विश्वास आणि जिद्दीमुळेच हे शक्य होतं. UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चे यशस्वी उमेदवार IAS अनिल बसाक यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झालेले अनिल यांचे वडील गावातील कापड विक्रेते आहेत. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.
अनिल यांचा जन्म बिहारमधील किशनगंज येथे झाला. ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला ते अत्यंत गरीब होते. घराला नीट छप्परही नव्हते. त्यांच्या वडिलांचे नाव विनोद बसाक आणि आईचे नाव मंजू देवी आहे. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1995 रोजी झाला. अनिल यांनी किशनगंजमधील ओरिएंटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि औरिया पब्लिक स्कूलमधून दहावी पूर्ण केली.
किशनगंज येथील बाल मंदिर येथून त्यांनी बारावी केली आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. अनिल यांचे वडील राजस्थानमध्ये एका व्यावसायिकाकडे मदतनीस म्हणून काम करायचे. ते आपल्या गावी परतले आणि घरोघरी कपडे विकू लागले. त्यांनी आपल्या गावात कपडे विकायला सुरुवात केली आणि आजही त्याच ठिकाणी स्वतःच्या छोट्याशा दुकानात हे काम सुरू आहे.
वडिलांनी हा छोटासा व्य़वसाय सुरू केला आहे. अनिल हे दहावी उत्तीर्ण झालेले त्याच्या कुटुंबातील दुसरे सदस्य आहे. वडील चौथीपर्यंतच शिकले होते. वडिलांनी आपल्या 4 मुलांना शिकवले. अनिल यांच्या मोठ्या भावाला बिहारमध्ये पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली आणि मधल्या काळात अनिल आयएएस अधिकारी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"