लय भारी! अवघ्या 22 व्या वर्षी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:27 AM2024-08-26T11:27:00+5:302024-08-26T11:33:30+5:30
IAS Chandrajyoti Singh : २०१९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २८ वा रँक मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या चंद्रज्योती सिंह यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलं.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. २०१९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २८ वा रँक मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या चंद्रज्योती सिंह यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलं. त्यांच्या मेहनतीने त्यांनी ही एक अनोखी कामगिरी केली आहे.
चंद्रज्योती सिंह यांच्या मनात देशसेवेची आवड लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबामुळे निर्माण झाली होती. त्यांचे वडील दलबरा सिंह हे निवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांची आई मीना सिंह यांनी देखील सैन्यात सेवा बजावली आहे. या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळेच चंद्रज्योती यांना भारतीय प्रशासकीय सेवेचा (IAS) भाग बनण्यास प्रेरित केलं.
ग्रेज्युएशन पूर्ण केल्यानंतर चंद्रज्योती यांनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि यूपीएससीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलं. या महत्त्वाच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटची मदत घेतली नाही आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवला. त्या दिवसातून ६ ते ८ तास अभ्यास करायच्या आणि जसजशी परीक्षा जवळ आली तसतसा हा वेळ १० तास किंवा त्याहून अधिक झाला.
चंद्रज्योती यांच्या यशाचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची प्रभावी प्लॅनिंग. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी ठोस नियोजन करणं आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला. तुम्ही तुमची तयारी सोपी आणि व्यवस्थित ठेवली आणि तुम्ही केलेल्या प्लॅनिंगचं पालन केलंत तर यश नक्कीच मिळेल. यूपीएससी किंवा इतर कोणत्याही कठीण परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांसाठी चंद्रज्योती यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.