कष्टाचं फळ! 10व्या वर्षी हॉटेल क्लीनर, न्यूजपेपर वाटायचं काम केलं; अनाथाश्रमात वाढला, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:34 PM2023-06-23T12:34:11+5:302023-06-23T12:42:47+5:30
IAS officer B Abdul Nasar : आयएएस अधिकारी बी अब्दुल नासर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावलं. त्यानंतर त्यांना अत्यंत संघर्षमय जीवन जगावे लागलं.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका तरुणाने संघर्षमय प्रवास करत घवघवीत यश संपादन केलं आहे. बी अब्दुल नासर असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. आयएएस अधिकारी बी अब्दुल नासर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावलं. त्यानंतर त्यांना अत्यंत संघर्षमय जीवन जगावं लागलं.
नासर यांची आई उदरनिर्वाह करण्यासाठी एका घरामध्ये काम करायची. तर ते आणि त्यांची भावंडं ही अनाथ आश्रमात राहिली. तब्बल 13 वर्षे केरळमधील एका अनाथ आश्रमात राहून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी हॉटेल क्लीनर आणि सप्लायर म्हणून काम केलं. ते काही वेळा त्यांच्या अनाथाश्रमातून पळून देखील गेले पण अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत आले.
अत्यंत गरिबी असूनही त्यांनी 12वी पूर्ण केली आणि नंतर थलासरी येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. फोन ऑपरेटर आणि न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय सारख्या नोकऱ्या केल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर, नासर 1994 मध्ये केरळ आरोग्य विभागाचे अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. त्यांनी 2006 मध्ये राज्य नागरी सेवेअंतर्गत उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं.
2015 मध्ये नासर यांना केरळमधील सर्वोत्तम उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले. 2017 मध्ये बी अब्दुल नासर यांना आयएएस अधिकारी पदावर बढती देण्यात आली. 2019 मध्ये कोल्लमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी केरळ सरकारचे गृहनिर्माण आयुक्त म्हणून काम केलं आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.