एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:21 AM2024-08-02T11:21:35+5:302024-08-02T11:22:01+5:30
बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेत आले आणि यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
मुंबई - महाराष्ट्र कॅडरची प्रशिक्षित आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता अधिकारी होणार नाही. यूपीएससीकडून पूजाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातही पूजा अधिकारी होऊ शकत नाही. अधिकारी बनण्यासाठी पूजानं जे कारनामे केले त्यामुळे पूजा चर्चेत आली. या प्रतापामुळे तिच्या करिअरवर ग्रहण लागलं. पूजा नेमकी कुठे चुकली आणि कोणकोणते जुगाड तिच्या अंगलट आले हे जाणून घेऊ
पूजा खेडकरनं देशातील सर्वात प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा पास केली होती. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ती ८४१ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर ट्रेनिंग घेत असिस्टेंट कलेक्टर या पदावर ज्वाईन झाली होती. परंतु गाडीवर लाल दिवा लावण्याची इच्छा आणि अतिरिक्त कलेक्टरच्या चेंबरवर कब्जा करण्याचा प्रयत्न यामुळे तिचा सर्वच खेळ उघड झाला. पूजा खेडकर त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने तिच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला आणि पुण्याचे अतिरिक्त कलेक्टर सुहास दिवासे यांच्या चेंबरवर कब्जा केला. दिवासे यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांची बदली वाशिमला झाली. मात्र कहाणी इथेच संपली नाही.
बनावट प्रमाणपत्राचा सापळा
पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर तिच्या आयएएस बनण्याचा प्रवास तपासला गेला. त्यानंतर एक एक करून अनेक खोट्या कथा समोर आल्या. पूजानं यूपीएससीच्या कोट्यात येण्यासाठी ओबीसीचं बनावट प्रमाणपत्र जमा केले होते. तिने केवळ ओबीसी प्रमाणपत्रच नव्हे तर दिव्यांग असल्याचा खोटा दाखलाही दिला होता. पूजा खेडकरनं स्वत: दृष्टीने कमकुवत आहे असा दावा केला होता. काही गोष्टी तिला आठवणीत राहत नाही अशी मानसिक अवस्था असल्याचं सांगितले होते. यूपीएससीत अशा विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कोटा असतो.
केवळ सरकारी हॉस्पिटलचा रिपोर्ट यूपीएससीला बंधनकारक असतो. त्यानंतर यूपीएससीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. पूजाच्या मेडिकल चाचणीसाठी ६ वेळा एम्सच्या डॉक्टरांची वेळ घेतली, मात्र काही ना काही बहाणा करून ती चाचणीपासून वेळ काढत होती. जेव्हा तपास पूर्ण झाला तेव्हा पूजाचं मानसिक सर्टिफिकेट बनावट असल्याचं उघड झालं. इतकेच नाही तर २०२० मध्ये पूजानं सेंट्रल एडमिनिस्ट्रेटिवह ट्रिब्यूनलसाठी दिलेल्या अर्जात तिचं वय ३० दाखवलं होते. मात्र २०२३ साली दिलेल्या अर्जात वय ३१ होते. पूजानं स्वत:चं आणि आई वडिलांचं नाव बदलून अनेकदा यूपीएससी परीक्षा दिली. ओबीसी उमेदवार केवळ ९ वेळा परीक्षा देऊ शकतो परंतु पूजाने त्याहून अधिक वेळा परीक्षा दिली.
१५ वर्षाचा रेकॉर्ड तपासला
पूजा खेडकर प्रकरणात तपास करताना यूपीएससीनं मागील १५ वर्षाचा डेटा तपासला. त्यात खेडकरचं एकमेव प्रकरण होतं ज्यात तिने किती वेळा परीक्षा दिली हे कळत नव्हतं. कारण प्रत्येकवेळी तिने स्वत:चं नाव आणि आई वडिलांचे नाव बदलून परीक्षा दिली होती. आता भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी यूपीएससीनं कठोर नियमावली तयार करण्यावर जोर दिला आहे.
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता
चहुबाजूने आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेली पूजा खेडकरनं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. परंतु कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. त्यामुळे आता पूजाला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.