IAS अधिकारी पूजा सिंघल निलंबित, ईडीसमोर CA ने उलगडले कोट्यवधी रुपयांचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:12 PM2022-05-12T15:12:23+5:302022-05-12T15:43:59+5:30
IAS अधिकारी पूजा सिंघलला मनी लाँड्रिंग, मनरेगा घोटाळा आणि कथुलिया खाण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
नवी दिल्ली: झारखंडच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांना निलंबित करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग, मनरेगा घोटाळा आणि कथुलिया खाण प्रकरणात पूजा सिंघलला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. ईडीने पूजा सिंघलच्या सीए सुमन कुमार यांच्या घरातून 17.49 कोटी रुपये जप्त केले होते. सीएम सुमन कुमार यांनी सांगितले की, हा पैसा पूजा सिंघलचा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सीए सुमन कुमार यांनी जप्त केलेल्या रोख रकमेचे रहस्य उलगडले आहे. सुमन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून जप्त केलेले 17.49 कोटी रुपये पूजा सिंघलचे आहेत. नुकतेच सुमनने पूजाच्या पतीला तीन कोटी रुपये रोख दिले होते. यासोबतच पूजा सिंघलने लाच घेतल्याचेही समोर आले आहे.
ईडीकडून चौकशी
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या IAS पूजा सिंघल यांची ईडी पाच दिवस चौकशी करणार आहे. न्यायालयाने ईडीला चौकशीसाठी रिमांड घेण्याची परवानगी दिली आहे. ईडीने चौकशीसाठी 12 दिवसांची परवानगी मागितली होती, परंतु त्यांना केवळ 5 दिवसांची परवानगी देण्यात आली. पाच दिवसांच्या चौकशीनंतर पूजा सिंघलला 16 मे रोजी पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.