ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:58 AM2020-05-05T08:58:10+5:302020-05-05T08:58:31+5:30
राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा सुपूर्द; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका
चंदिगढ: सरकारी कर्तव्य बजावताना असुरक्षित वाटत असल्याचं कारण देत २०१४ च्या हरयाणा केडरच्या आयएएस अधिकारी राणी नागर यांनी राजीनामा दिला आहे. राणी नागर सध्या आर्काइव्ह्स विभागाच्या संचालिका म्हणून काम करत होत्या. राणी यांनी वैयक्तिक सुरक्षेचं कारण देत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं राज्य सरकारला लक्ष्य केलं. राणी यांचा राजीनामा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं अपयश नाही का, असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे.
राणी नागर यांनी काल त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला. माझा राजीनामा केंद्र सरकारमधील योग्य विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. राजीनाम्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवणार असल्याचं राणी यांनी सांगितलं. सरकारी कर्तव्यावर असताना सुरक्षित वाटत नसल्यानं राजीनामा देत आहे, असं राणी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मी आज (४ मे २०२०) अतिशय नम्रपणे भारतीय प्रशासकीय सेवेतील माझ्या पदाचा आज राजीनामा देत आहे, असं राणी यांना पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी फेसबुक पेजवरदेखील राजीनाम्याचं पत्र शेअर केलं. त्यानंतर त्या चंदिगढमधून त्यांच्या गाझियाबादमधील घरी निघून गेल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचं राणी यांनी काही दिवसांपूर्वीच एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.
राणी नागर जून २०१८ मध्ये चर्चेत आल्या होत्या. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या पदावरील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यानं हे आरोप फेटाळले होते. डिसेंबर २०१७ मध्ये राणी नागर सिरसा जिल्ह्यातल्या डबावलीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात बेकायदा प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर नागर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तत्काळ कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.