रुग्णालयात बेडवर पाय ठेवणा-या आयएएस अधिका-याने मागितली फेसबूकवरुन माफी
By Admin | Published: May 9, 2016 08:39 AM2016-05-09T08:39:16+5:302016-05-09T08:39:16+5:30
आयएएस अधिकारी जगदीश सोनकर यांचा रुग्णालयात बेडवर पाय ठेवून आजारी मुलाच्या आईशी बोलतानाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे
>ऑनलाइन लोकमत -
रायपूर, दि. 09 - आयएएस अधिकारी जगदीश सोनकर यांचा रुग्णालयात बेडवर पाय ठेवून आजारी मुलाच्या आईशी बोलतानाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर त्यांनी माफी मागितली आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी माफी मागितली आहे. स्वत: डॉक्टर असणा-या जगदीश सोनकर यांच्यावर सोशल मिडियामधून जोरदार टीका करण्यात आली होती.
'मी हे जाणूनुजून केलं नव्हत. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो', असं जगदीश सोनकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'सध्या प्रसारमाध्यम आणि सोशल मिडियामध्ये माझा फोटो व्हायरल होत आहे त्यासाठी मी सशर्त माफी मागत आहे. कोणत्याही प्रकारे त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. ते जाणुनबुजून करण्यात आलं नव्हतं तसंच दुर्लक्षितही केलं जाऊ शकत नाही. यामुळे आमच्या प्रतिमेला धक्का लागला आहे याची जाणीव आहे. मी प्रत्येकाची माफी मागतो', असं जगदीश सोनकर यांनी लिहिलं आहे.
जगदीश सोनकर 2013च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे मेडिकल डिग्रीदेखील आहे. बलरामपूर जिल्ह्यातील रामानागुंजमध्ये उपविभागीय दंडाधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. कुपोषणग्रस्त मुलांच्या आईंशी चर्चा करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी जगदीश सोनकर सरकारी रुग्णालयात गेले होते.
या रुग्णालयात कुपोषित मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. यावेळी एका मुलाच्या आईशी बोलताना जगदीश सोनकर यांचा बेडच्या लोखंडी दांड्याला पाय लावून उभा असलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या रुग्णालयात मुलांना व्यवस्थित उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र प्रशासनातील व्यक्तीच्या या अशा वागण्याने त्यांच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.