आयुक्तांनी सरकारी बसमधून प्रवास केला; तब्बल २७ ड्रायव्हर, कंडक्टरच्या नोकऱ्या गेल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:34 PM2021-09-03T14:34:05+5:302021-09-03T14:34:23+5:30
आयुक्तांच्या बस प्रवासानं परिवहन विभागात खळबळ; बसेसची देखभाल करणाऱ्या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस
लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरचे आयुक्त डॉ. राजशेखर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राजशेखर एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सरकारी बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. बस प्रवासात सामान्य प्रवाशांना अडचणी जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी बसमधून प्रवास केला. आयुक्तांच्या या प्रवासानंतर परिवहन विभागात खळबळ उडाली.
१३ बस वाहक, १४ चालकांविरोधात कारवाई
आयुक्त राजशेखर यांच्यासोबतच जिल्ह्यातील आणखी ७ अधिकाऱ्यांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे प्रवास केला. जवळपास सगळ्याच बसमधील वाहक, चालक विनामास्क आढळून आले. याशिवाय तिकिटामध्ये अपहार होत असल्याचंही दिसून आलं. वाहक काही प्रवाशांकडून पैसे घेतात. मात्र त्यांना तिकीट देत नसल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर तातडीनं १३ बस चालकांना निलंबित करण्यात आलं. १४ चालकांची सेवा संपवण्याचा आदेश आयुक्तांनी दिला.
एआरएमला नोटीस बजावली
अनेक बसेसची देखभाल नीट होत नसल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आली. त्यानंतर एआरएमला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बसेसच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या खासगी एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या या एजन्सीलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.