Success Story: कौटुंबिक हिंसा अन् घटस्फोटाची कोर्ट केस; अनेक संकटांवर मात करून शिवांगी गोयल बनल्या IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:21 PM2023-02-09T20:21:13+5:302023-02-09T20:22:22+5:30
Success Story, IAS Shivangi Goyal: दरवर्षी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी अनेकांची स्टोरी प्रेरणादायी असते.
नवी दिल्ली : दरवर्षी UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी अनेकांची स्टोरी प्रेरणादायी असते. गरीबीतून यशाचे शिखर गाठलेल्या अधिकाऱ्यांची कहाणी कुणालाही प्रेरणा देण्यासाठी पुरेशी असते. UPSC CSE 2021 ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिवांगी गोयल यांची यशोगाथा ही जगातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणा आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हापूरच्या पिलखुवा शहरात राहणाऱ्या शिवांगी गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्यांनी त्यांचा खूप छळ केला. पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या ध्येयावर ठाम राहून यशाचे शिखर गाठले.
पतीच्या त्रासाला कंटाळून आल्या माहेरी
शिवांगी गोयल अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी लग्नापूर्वी दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. पण दोन्ही वेळा अपयश आले. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती व सासरच्या लोकांनी त्यांना मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांना एक मुलगी झाली. तिच्या जन्मानंतरही पतीचा दृष्टिकोन बदलला नाही आणि नंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या माहेरच्या घरी बोलावले.
माहेरी मिळाला आशेचा किरण
शिवांगी गोयल आपल्या 7 वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला की, तुला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी वाटेल ते करेन. खूप आश्वासन आणि आशा मिळाल्यानंतर शिवांगी यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी म्हणजे 2021 मध्ये त्या तिसर्या प्रयत्नात 177 व्या रँकसह IAS अधिकारी बनल्या.
कुटुंबाला दिले यशाचे श्रेय
शिवांगी गोयल यांचे लग्नानंतरचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्या पूर्णपणे खचल्या होत्या. या सगळ्यातून बाहेर पडून आपल्या मुलीचे आयुष्य कसे चांगले करावे हे त्यांना समजत नव्हते. शिवांगी गोयल यांचा घटस्फोटाचा खटला UPSC परीक्षेचा निकाल येईपर्यंत कोर्टात सुरू होता. पण त्या त्यांच्या ध्येयावर टिकून राहिल्या आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"