शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 03:51 PM2024-09-20T15:51:28+5:302024-09-20T15:58:40+5:30
IAS Shraddha Gome : श्रद्धा गोमे यांनी वयाच्या २६ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरीची ऑफरही नाकारली होती.
श्रद्धा गोमे या मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण इंदूरमधून पूर्ण केलं. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत जवळपास प्रत्येक परीक्षेत श्रद्धा टॉपर होत्या. लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. श्रद्धा यांचे वडील रमेश कुमार गोमे हे सेवानिवृत्त एसबीआय अधिकारी आहेत आणि आई वंदना गृहिणी आहेत. श्रद्धा यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया...
श्रद्धा गोमे यांनी वयाच्या २६ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरीची ऑफरही नाकारली होती. देशात राहून सरकारी नोकरी करायची होती. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. IAS श्रद्धा यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्या फक्त शाळेतच नाहीत तर इंदूरमध्ये टॉपर होत्या. २०१८ मध्ये बीए एलएलबी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा यांनी एकूण १३ गोल्ड मेडल जिंकले. तेव्हा स्वत: चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी त्यांना सन्मानित केलं होतं. कायद्याचं शिक्षण पूर्ण करताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये लीगल मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.
UPSC मुलाखतीची तयारी करण्यासाठी श्रद्धा १५ दिवस दिल्लीत राहिल्या. येथे त्यांनी अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले. ६० व्या रँकसह त्या IAS अधिकारी झाल्या. त्यांना राजस्थान केडर देण्यात आले आहे. सध्या त्या अजमेरमध्ये असिस्टेंट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. IAS श्रद्धा गोमे या २०२२ च्या बॅचच्या सरकारी अधिकारी आहेत. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात.