कमाल! सहावीत नापास झाली पण 'ती' खचली नाही; IAS अधिकारी होऊन घेतली नेत्रदिपक भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:12 PM2023-01-07T15:12:07+5:302023-01-07T15:13:20+5:30
IAS Rukmani Riar : रुक्मणी रियार यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. ज्यांनी पहिल्याच प्रयत्नाच संपूर्ण भारतातून दुसरे स्थान मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC ची तयारी करतात, अनेक उमेदवार या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतात, तर काही सेल्फ स्टडीवर अधिक भर देतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. पंजाबच्या गुरदासपूरच्या रहिवासी रुक्मणी रियार (IAS Rukmani Riar) यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. ज्यांनी पहिल्याच प्रयत्नाच संपूर्ण भारतातून दुसरे स्थान मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
रुक्मणी रियार सुरुवातीला अभ्यासात फार हुशार नव्हत्या. इयत्ता सहावीत असताना त्या नापास झाल्या होत्या, नापास झाल्यावर त्य़ांनी कुटुंब आणि शिक्षकांसमोर जाण्याची हिंमत केली नाही आणि याबद्दल त्यांना खूप लाज वाटली. तसेच लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचाही खूप त्रास झाला. काही महिन्यांनंतर, त्यांनी स्वतःला या नैराश्यातून बाहेर काढले आणि अभ्यास सुरू केला. रुक्मणी रियार यांनी गुरुदासपूर येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले.
बारावीनंतर रुक्मणी यांनी अमृतसर येथील गुरू नानक देव विद्यापीठातून सोशल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूटमध्ये पुढचं शिक्षण घेतलं आणि सुवर्णपदक पटकावलं. यानंतर रुक्मणी यूपीएससीकडे वळल्या आणि तयारी करू लागल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं, त्यासाठी त्यांनी सेल्फ स्टडीकडे अधिक लक्ष दिले. रुक्मणी यांनी 2011 मध्ये यूपीएससीमध्ये ऑल इंडिया रँक 2 मिळवला आणि आयएस झाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"