जाहिरातीचा डोक्याला 'शॉट', सरकारने मारली काट! बलात्काराच्या विकृतीला प्रोत्साहन दिल्याचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 07:07 AM2022-06-05T07:07:09+5:302022-06-05T07:08:21+5:30
I&B Ministry suspends controversial deodorant advertisement : मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला ही जाहिरात त्वरित हटवण्यास सांगितले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितले.
नवी दिल्ली : एका बॉडी स्प्रे ब्रँडच्या दोन जाहिरातींमुळे मोठा वाद निर्माण झाला असून यातून बलात्काराच्या विकृतीला प्रोत्साहन दिल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे सरकारने शनिवारी ट्विटर आणि यूट्यूबला दोन्ही वादग्रस्त जाहिराती तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले. “सोशल मीडियावर बॉडी स्प्रेची अयोग्य आणि अपमानास्पद जाहिरात प्रसारित केली जात असल्याचे लक्षात आले आहे. मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला ही जाहिरात त्वरित हटवण्यास सांगितले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितले.
नियमांचे गंभीर उल्लंघन
भारतीय जाहिरात प्रमाणीकरण परिषदेने या जाहिरातीचे नियमांचे ‘गंभीर उल्लंघन’ आणि सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असल्याचे नमूद केल्यानंतर ही कारवाई केली.
पहिल्या जाहिरातीत काय?
चार तरुण मुले एका दुकानात बोलत असतात. परफ्यूमची शेवटची बाटली पाहून आपल्या चौघांपैकी ‘शॉट’ कोण घेणार यावर चर्चा करतात. यावेळी बॉडी स्प्रेऐवजी तरुणी दाखविली आहे. त्यांचे संवाद ऐकून मुलगी थरथर कापत मागे वळते. ते आपल्याबाबात बोलत आहेत असे तिला वाटते.
दुसऱ्या जाहिरातीत काय?
बेडरूममधील जोडप्यापासून सुरू होते. चार मित्र तिथे येतात व ‘लगता है शॉट मारा, अब हमारी बारी’ असे म्हणतात. जाहिरात पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनी खोलीतील परफ्यूम वापरता येईल का, अशी विचारणा केल्याचे कळते.
स्वरा भास्कर, फरहान अख्तर यांच्यासारख्या अनेक कलाकारांनीही यावर सडकून टीका केली. टीव्ही चॅनलवरूनही ही जाहिरात हटविली आहे.
ही लज्जास्पद आणि वाह्यात जाहिरात बलात्कार विकृतीला प्रोत्साहन देत आहे. आम्ही या कंपनीवर कठोर कारवाईची मागणी करत आहोत. - स्वाती मालीवाल, अध्यक्ष, दिल्ली महिला आयोग