हिमाचल, उत्तराखंड, काश्मिरात बर्फवृष्टी
By Admin | Published: January 8, 2017 12:50 AM2017-01-08T00:50:55+5:302017-01-08T00:50:55+5:30
तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेलाच राहिला. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत
नवी दिल्ली : तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेलाच राहिला. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही बर्फवृष्टी झाली असून, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पाऊस झाला आहे.
काश्मीर खोऱ्याची जीवन रेषा असलेला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहिला. पीर पांजाल पर्वतराजीत अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळून, तसेच जमीन खचून महामार्ग बंद झाला आहे. श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीवर बर्फ साचला असल्याने, हवाई वाहतूकही ठप्प आहे. गुलमर्ग स्की रिसॉर्ट येथील तापमान उणे (-) ८.४ अंशावर घसरले आहे. हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. पहलगाम, लेह लदाख आणि राजधानी श्रीनगर अशा बहुतांश सर्वच ठिकाणी तापमान शून्याच्या खाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली.
हिमाचल प्रदेशातील सिमलात या वर्षाची पहिली बर्फवृष्टी झाली. रस्ते बंद झाल्यामुळे सिमला आणि किन्नौर भागाचा संपर्क तुटला आहे. सिमला आणि भुंटर येथील तापमान 0.२ अंशांपर्यंत घसरले आहे. उत्तराखंडमधील नैनितालमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच बर्फ पडला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- मसुरीतही बर्फवृष्टी झाली. कुमाँव आणि गढवाल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमालयातील चारधाम यात्रेतील जगप्रसिद्ध मंदिरांचे मार्ग बर्फवृष्टीमुळे बंद झाले आहेत. राज्याच्या मैदानी प्रदेशात जोरदार पाऊस झाला.