ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 07:39 AM2021-07-18T07:39:16+5:302021-07-18T07:39:54+5:30

भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे.

icmr prof panda claims that india could face corona third wave might be come end of august month | ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविला आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. प्रा. पांडा यांनी याबाबत सांगितले, की तिसरी लाट अटळ आहे. 

ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धाेकादायक ठरेल, असे प्रा. पांडा म्हणाले. ‘आयसीएमआर’ आणि लंडनच्या इम्पिरियल काॅलेजने विकसित केलेल्या गणितीय माॅडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असे प्रा. पांडा यांनी सांगितले.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रा. पांडा म्हणाले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने केलेल्या एका संशोधनाकडेही प्रा. पांडा यांनी लक्ष वेधले.

३८,०७९ जणांना कोरोनाचा  संसर्ग; ५६० जण मृत्युमुखी

३८,०७९ नवे कोरोना रुग्ण देशात सापडले. त्याबरोबर एकूण बाधितांचा आकडा ३,१०,६४,९०८ झाला. तसेच ५६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ४,१३,०९१ झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घसरून ४,२४,०२५ झाली असून ती एकूण बाधितांच्या तुलनेत १.३६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९७.३१ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ६,३९७ ने कमी झाली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५६० मृत्यूत सर्वाधिक १६७ मृत्यू महाराष्ट्रातील आहे. त्याखालोखाल केरळात १३० जण मरण पावले. देशातील मृतांची एकूण संख्या ४,१३,०९१ असून त्यात महाराष्ट्रातील संख्या १,२६,७२७, तर कर्नाटकातील संख्या ३६,०७९ आहे. तामिळनाडूत ३३,६५२, दिल्लीत २५,०२३ आणि उत्तर प्रदेशात २२,७११ जण मरण पावले.
 

Web Title: icmr prof panda claims that india could face corona third wave might be come end of august month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.