राजस्थानात कोरोना रॅपिड टेस्टिंग किट फेल; दोन दिवस रॅपिड टेस्ट थांबवा, ICMRची राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:12 PM2020-04-21T18:12:52+5:302020-04-21T18:34:09+5:30
राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत.
जयपूर : कोरोना तपासणी अहवाल चुकीचा येत असल्याने राजस्थानसरकारने रॅपिड टेस्ट किटचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. यासंदर्भात बोलताना राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा म्हणाले, या किटचे अहवाल चुकीचे येत आहेत. या किट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आम्हाला पाठवल्या होत्या. यासंदर्भात आम्ही त्यांनादेखील माहिती दिली आहे. रॅपिड टेस्ट किटच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने, आता आयसीएमआरनेही पुढील दोन दिवस रॅपिड टेस्ट करू नेये, अशी सूचना सर्व राज्यांना दिली आहेत.
राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ या टेस्ट किट नकृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे.
रॅपिड टेस्ट किट फेल झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते, किटच्या दुसऱ्या लॉटचीही तपासणी केली जात आहे. मात्र, त्याही खराब आढळल्या तर सरकार त्या परत करेल. या किटच्या माध्यमाने कोरोना तपासणीसाठी केवळ 600 रुपये एवढाच खर्च येतो.
अँटी बॉडी रॅपिड किटने रुग्णांच्या तपासणीची सुरुवात करणारे राजस्थान हे देशातील पहिलेच राज्य आहे. राजस्थानात सोमवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशीही रॅपिड किटने 2,000 जणांची तपासणी करण्यात आली. यात एकाच कुटुंबातील 5 जण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, आता या किटवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राजस्थान सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.