आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:29 AM2021-03-02T05:29:15+5:302021-03-02T05:29:32+5:30
दहावीची ५ मे, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिलपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डानेही (आयसीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा ५ मे ते ७ जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत होणार आहे.
आयसीएसई मंडळाने साेमवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक केले आहे. एखादा विद्यार्थी दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने पोहोचल्यास त्याला उशिरा पोहोचण्याचे योग्य कारण न देता आल्यास परीक्षेसाठी प्रवेश देता येणार नाही. .
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचता यावी यासाठी परीक्षेच्या १५ मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. मात्र परीक्षेला सुरुवात दिलेल्या वेळेतच होईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क बंधनकारक असून, दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सहा फुटांपेक्षा जास्त ठेवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.