Coronavirus: CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:53 AM2020-03-19T11:53:30+5:302020-03-19T12:35:12+5:30
सीबीएससी पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. यापार्श्वभूमीवर आता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरी अराथून यांनी ही माहिती दिली.
ICSE board postpones class 10, 12 examinations due to coronavirus threat, say officials
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
संपूर्ण देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी सीबीएसई बोर्डानेही सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे उर्वरित पेपर 31 मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे. मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 169 वर पोहोचला आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.