'या' पद्धतीने शाळा सुरू करण्याचा विचार, लवकरच निर्णय घेणार केंद्र सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:19 AM2020-08-10T11:19:54+5:302020-08-10T11:23:29+5:30
केंद्र सरकारकडून सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यानंतर, 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. स
नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष अद्यापही नीटनेटकेपणे सुरु झाले नाही. विद्यार्थ्यांची ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातूनच शाळा भरतेय. त्यामुळे शाळा किंवा कॉलेजेच नेमके कधी सुरु होणार, याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांनाही उत्सुकता लागली आहे. आता, केंद्र सरकारकडून शाळा व महाविद्यालये सुरु करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत 10 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा अन् कॉलेज सुरु करण्याचा विचार आहे. त्यातही, सोशल डिस्टन्स आणि खबरदारी आवश्यक असणार आहे.
केंद्र सरकारकडून सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यानंतर, 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. समजा, एखाद्या शाळेत एकाच इयत्तेचे 4 वर्ग भरत असतील, तर त्या शाळेत केवळ 2 वर्गच भरविण्यात येतील. एक दिवसाआड पद्धतीने हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. तसेच, शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर शाळेतील सर्व वर्गांचे सॅनिटायझेन करण्यात येईल. तसेच, शाळेत केवळ 33 टक्केच स्टाफला हजर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून या महिनाअखेरीस शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद असून ऑनलाईन प्रवेश आणि शिक्षण सुरू झाले आहे. कोरोनाच्या भितीमुळे पालकही आपल्या मुलांना शाळेत पाठवायला इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर होत आहे. सरकारने, अनलॉक 3 ची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.