दातृत्वाचा आदर्श; निवृत्त प्राध्यापिकेने दिली ९७ लाख रुपयांची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:30 AM2019-12-02T04:30:01+5:302019-12-02T04:35:02+5:30
कोलकाता शहरातील बागुईती या विभागातील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात.
कोलकाता : दर महिना सुमारे ५० हजार रुपये निवृत्तीवेतन असलेल्या पश्चिम बंगालमधील माजी प्राध्यापक चित्रलेखा मलिक यांनी २००२ सालापासून आतापर्यंत सुमारे ९७ लाख रुपयांची देणगी राज्यातील विविध शिक्षणसंस्थांना दिली असून, दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.
कोलकाता शहरातील बागुईती या विभागातील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात. ९७ लाख रुपये देणगीपैकी ५० लाख रुपये संशोधनातील माझे मार्गदर्शक पंडित बिधुभूषण भट्टाचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जादवपूर विद्यापीठाला गेल्या वर्षी दिले आहेत. या माहितीला विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
राजाबाजार भागातील व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटमध्ये त्या संस्कृतच्या अध्यापक होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पंडित बिधुभूषण भट्टाचार्य यांच्या पत्नी हेमावती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जादवपूर विद्यापीठाला ६ लाख रुपयांची स्वतंत्र देणगी दिली आहे.
हावडा येथील इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड मेडिकल रिसर्च या संस्थेला चित्रलेखा मलिक यांनी ३१ लाख रुपयांची देणगी दिली. २००२ ते २०१८ या कालावधीत शिक्षणासाठी त्यांनी देणग्या दिल्या.
आणखी दोन देणग्या देणार
- निवृत्त प्राध्यापक चित्रलेखा मलिक म्हणाल्या की, आपल्या गरजा कमी करून साधे राहणीमान ठेवा, अशी शिकवण उपनिषदांनी दिली आहे. रोजच्या खर्चासाठी, जगण्यासाठी मला फार पैसे लागत नाहीत.
त्यामुळे उरलेले पैसे मी दान करते. लोकोपयोगी कार्यासाठी नजीकच्या काळात त्या अजून दोन मोठ्या देणग्या देणार आहेत.