'देवी अन्नपूर्णा'ची १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली मूर्ती कॅनडाहून परत आणणार; मोदींची घोषणा
By मोरेश्वर येरम | Published: November 29, 2020 03:36 PM2020-11-29T15:36:20+5:302020-11-29T15:41:02+5:30
देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते.
नवी दिल्ली
भारतीय परंपरेचा वारसा असलेली १०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परत आणणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमात दिली. आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी ही मूर्ती चोरुन कॅनडाला नेली होती.
"मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. देवी अन्नपूर्णाची एक प्राचीन मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे, हे ऐकून प्रत्येक भारतीयाला गर्व होईल. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरुन देशाबाहेर नेण्यात आली होती. ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी आभार मानतो'', असं मोदी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले.
मोदींनी यावेळी या मूर्तीचे महत्व देखील सांगितले. ''देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा काशी शहराशी खूप जुना संबंध आहे. त्यामुळे ही मूर्ती भारतात परत येणं आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माता अन्नपूर्णा मूर्तीसह आपल्या अनेक प्राचीन मूर्ती आणि ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा शिकार झाला आहे. चोरांच्या या टोळ्या प्राचीन वस्तूंची मोठ्या किंमतीत विक्री करतात. पण भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आजवर अशा अनेक मूर्ती आणि कलाकृता पुन्हा देशात आणण्यात यश आले आहे.", असंही मोदी म्हणाले.
''देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात येण्यासोबतच एक योगायोग असा की काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा आठवडा साजरा करण्यात आला. संस्कृतीप्रेमींसाी जुन्या काळात जाण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी ही एक संधी असते. कोरोनाच्या काळात आपण यावेळी वेगळ्या पद्धतीनं हा आठवडा साजरा केला. शेवटी संकटाच्या काळात संस्कृती कामी येते. संस्कृती तुम्हाला एक भावनिक प्रेरणा देण्याचं काम करत असते'', असं मोदी म्हणाले.
अन्नपूर्णा मूर्तीचा हा १८ व्या शतकातील ठेवा रेजिना विद्यापीठाचे कुलगुरू थॉमस चेस यांच्या हस्ते भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार आणि सीमा सेवा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. अन्नपूर्णाची ही मूर्ती मूळची वाराणसी येथील असून ती कॅनडाच्या सुप्रसिद्ध मॅकेन्झी आर्ट गॅलरीमध्ये होती.
भारतीय उच्चायुक्तलाच्या माहितीनुसार, अन्नपूर्णा देवीची मूर्ती संशयास्पद परिस्थितीत अधिग्रहित केली गेल्याचं कॅनडाच्या युनिर्व्हसीटीने मान्य केलं आहे. त्यामुळे सध्याच्या नैतिक अधिग्रहणाच्या तत्वांमध्ये असे अधिग्रहण योग्य ठरत नाही. या मुद्द्यावरुन कॅनडाने भारताला सहकार्य करत ही मूर्ती परत देण्याचे मान्य केले.