अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटल्यास...; कोलकाता हायकोर्टाने फटकारले, नेमके काय झाले होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 08:06 AM2024-03-04T08:06:23+5:302024-03-04T08:06:53+5:30
...त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.
कोलकाता : जर एखाद्या व्यक्तीने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले तर तो लैंगिक छळाचा गुन्हा मानला जाईल आणि त्याला आयपीसीच्या कलम ३५४ अ अंतर्गत तुरुंगात जावे लागू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.
नेमके काय झाले होते?
- पीडित महिला पोलिस कॉन्स्टेबल दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाल टिकरी येथे जात होती.
- जेव्हा पोलिसांचे पथक वेबी जंक्शनवर पोहोचले तेव्हा त्यांना कळाले की, एक व्यक्ती लोकांना त्रास देत आहे. काही पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. तर पीडिता आणि काही पोलिस एका दुकानासमोर थांबले होते.
- दुकानासमोर उभ्या असलेल्या आरोपीने फिर्यादीला अश्लील प्रश्न विचारला की, डार्लिंग चालान करायला आली होती का? यावर, मयाबंदर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३५४ अ (१) (iv) आणि ५०९ (महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृत्य) अंतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.
कोर्टाने निकाल देताना म्हटले की...
अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ अशा शब्दांनी हाक मारणे गुन्हा आहे. किमान सध्या तरी आपल्या समाजात रस्त्यावरील पुरुष अज्ञात महिलेसाठी कोणतीही भीती न बाळगता असे काहीही बोलण्यासाठी परवानगी असणारे कायदे नाहीत.
कलम ३५४अ (स्त्रींच्या विनयशीलतेचा अपमान करणारा) संदर्भ देत न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की हा कायदा अश्लील शब्दांचा वापर गुन्हा ठरवतो. पोलिस असो की अन्य कोणत्याही अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ म्हटले जाऊ शकत नाही. हे लैंगिक छळासारखेच कृत्य आहे.