आधार कार्ड असेल, तरच माध्यान्ह भोजन
By admin | Published: March 5, 2017 01:07 AM2017-03-05T01:07:45+5:302017-03-05T01:07:45+5:30
माध्यान्ह भोजनाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल, त्यांना आता आधार कार्डही सादर करावे लागेल. मनुष्यबळ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकी
नवी दिल्ली : माध्यान्ह भोजनाचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल, त्यांना आता आधार कार्डही सादर करावे लागेल. मनुष्यबळ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेत स्वयंपाकी म्हणून काम करणारे सहायक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांना आधार सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अमलबजावणी होईल.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आधार कार्ड नसलेल्यांसाठी ३0 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आधार कार्ड हा ओळखपत्राचा दस्तावेज आहे. सरकारच्या विविध सेवा, लाभ आणि सबसिडी यांची पुरवठा प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी तसेच हे लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना शाळा आणि विद्यार्थ्यांना पाठविली जाईल. त्यानुसार त्यांना आधार क्रमांकाचा पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल किंवा प्रमाणिकरण करण्यास सांगितले जाईल.
या योजनेत सहायक म्हणून काम करणाऱ्यांना माध्यान्ह भोजन बनविण्याचे आणि त्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम करावे लागते. या कामासाठी त्यांना सरकारकडून मानधन दिले जाते. या योजनेत सहायकांनाही लाभधारकच गृहीत धरले जाते. त्यामुळे त्यांनाही आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक केले जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)